

वाडा : जलरंग, कागद आणि समोर निसर्गाची एखादी फ्रेम असली की ज्याचे हात एखाद्या जादूगाराप्रमाणे जादू करतात व समोर जे उभे राहते ते चित्र बघून मनाला थक्क करते अशी ओळख असणाऱ्या वाडा तालुक्यातील कैलास लहांगे या अत्यंत गुणी कलाकाराची चित्र बघण्याची संधी कलाप्रेमींना लाभणार आहे. मुंबई येथील जहांगीर आर्ट गॅलरीत 12 ते 18 जानेवारी दरम्यान रंगप्रति नावाने कैलास याच्या चित्रांचे प्रदर्शन भरणार असून कलाप्रेमींसाठी ही मेजवानी ठरणार आहे.
नैसर्गिक दृश्ये, शहरदृश्ये, मंदिर, नदीघाट, बाजार अशा विविध ठिकाणांचे अतिशय सुंदर व जिवंत रंगसंगतीत आपल्या ब्रशच्या फटकाऱ्याने कागदावर उतरविणे ही त्याची खास ओळख असून छाया व प्रकाश यांचे अतिशय सुंदर नियोजन करण्यात कैलासचा हातखंडा आहे. तैलरंग, पोस्टर व ऍक्रॉलिक सह जलरंगांवर कैलासचे प्रभुत्व आहे. विविध ठिकाणी त्याने कार्यशाळा आयोजित करून प्रात्यक्षिक दाखवित कलाप्रेमींची पसंती मिळविली आहे.