

मुरबाड शहर : किशोर गायकवाड
नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मुरबाड नगरपंचायतीने उभारलेला आरओ प्लांट सध्या चर्चेचा आणि वादाचा विषय ठरला आहे. कारण हा आरओ प्लांट थेट भारत वाईन शॉपलगत उभारण्यात आला असून, नगरपंचायतीच्या नियोजनक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शुद्ध पाणी देण्याचा हेतू स्तुत्य असला, तरी त्यासाठी निवडलेली जागा मात्र अक्षरशः “विषारी” असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे मुरबाड तालुकाध्यक्ष दीपक अशोक वाघचौडे यांनी नगरपंचायतीला लेखी निवेदन देत, सदर आरओ प्लांट किंवा भारत वाईन शॉप तात्काळ स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे. या ठिकाणी महिलावर्ग, लहान मुले व ज्येष्ठ नागरिक पिण्याचे पाणी घेण्यासाठी येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र दारूच्या दुकानालगत कायमस्वरूपी असलेला दारुड्यांचा वावर, अस्वच्छता आणि गोंधळ यामुळे महिलांना येथे येणे असुरक्षित वाटत आहे. शुद्ध पाण्यासाठी रांग लावायची आणि बाजूलाच दारूच्या बाटल्यांचा खणखणाट ऐकायचा, हे कोणत्या सुजाण नियोजनाचे उदाहरण आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
या परिसरात धार्मिक तिर्थालये, विविध शासकीय कार्यालये, शहीद हिराजी पाटील यांचे स्मारक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असल्याने या ठिकाणचे सामाजिक आणि सांस्कृतिक पावित्र्य जपले जाणे अपेक्षित होते. मात्र दारूच्या दुकानालगत आरओ प्लांट उभारून प्रशासनाने या पावित्र्यावरच पाणी फेरल्याची भावना व्यक्त होत आहे. स्मारकांचा सन्मान कागदावर आणि प्रत्यक्षात मात्र दारू-पाण्याचा संगम, हीच का विकासाची नवी व्याख्या? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.