Palghar Hit And Run | पोलिसांच्या पाठलागात मद्यतस्करांच्या भरधाव कारचा थरार; नागरिक व दुचाकींना धडक

डहाणू तालुक्यातील कासा-चारोटी मार्गावरील कुरेशी दरबार परिसरातील घटना दोघांविरुद्ध जीवघेणा हल्ल्याचा गुन्हा
Dahanu Kasa Charoti Road Car Crash
Dahanu Kasa Charoti Road Car Crash Pudhari
Published on
Updated on

Dahanu Kasa Charoti Road Car Crash

कासा : डहाणू तालुक्यातील कासा-चारोटी मार्गावरील कुरेशी दरबार परिसरात सोमवारी (दि. ३) रात्री अवैध मद्याची वाहतूक करणाऱ्या भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांना आणि दुचाकींना धडक दिल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेत संदेश तुकाराम कवले आणि मयुर सुरेश कांबेरा हे जखमी झाले असून, काही अन्य नागरिकांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला, तर कारमधील एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले.

या प्रकरणी कासा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १३७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०९(१), ३(५), महाराष्ट्र मद्यप्राशन प्रतिबंधक कायद्यातील कलम ६५(ई) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ आणि १८७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dahanu Kasa Charoti Road Car Crash
Palghar International Airport: समुद्रात ९ कोटी प्रवाशांचे विमानतळ; डीपीआरची प्रक्रिया सुरू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदेश तुकाराम कवले (वय २४, रा. वांगर्जे आमरणपाडा, ता. डहाणू) हे आपल्या मित्रांसह कुरेशी दरबार परिसरात रस्त्यालगत उभे असताना चारोटीकडून कासाकडे भरधाव वेगाने येणारी एमएच-०६-एएफ-७९४० क्रमांकाची कार त्यांच्या दिशेने आली. कारचालक बिलाल (पूर्ण नाव उपलब्ध नाही) व त्याच्यासोबत असलेला अक्षय मोहन शिरसाट (रा. महिर, ता. साक्री, जि. धुळे) यांनी संगनमताने वाहनाचा जीवघेण्या शस्त्राप्रमाणे वापर करून संदेश कवले व त्यांचा मित्र मयुर कांबेरा यांना धडक दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या धडकेत दोघेही रस्त्यावर फेकले गेले. त्याचवेळी तेथे उभी असलेली एमएच-४८-डीपी-५४४६ क्रमांकाची दुचाकीही कारच्या धडकेत नुकसानग्रस्त झाली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी कार थांबविण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांच्या अंगावरही वाहन घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. मात्र, त्यांनी प्रसंगावधान राखून बाजूला झाल्याने मोठी दुर्घटना टळली.

Dahanu Kasa Charoti Road Car Crash
Palghar Crime News: लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर अत्याचार

अपघातानंतर चालकाने कार भरधाव वेगाने कासाच्या दिशेने पळवली. मात्र, दिपू गॅरेजसमोर वाहन रस्त्याखाली गेल्याने कारचा पुढील टायर वाकला. त्यानंतर चालक बिलाल फरार झाला, तर कारमधील अक्षय मोहन शिरसाट याला पोलिसांनी ताब्यात घेतले. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये अवैध मद्याचा साठा आढळून आला असून तो जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, अवैध मद्यवाहतूक करणाऱ्या या कारचा पोलिसांकडून पाठलाग सुरू होता. पोलिसांच्या कारवाईतून सुटण्यासाठी चालकाने वाहनाचा वेग वाढविल्याने आणि कासा-चारोटी मार्गावरील खड्डेमय रस्त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी कासा पोलीस ठाण्यात गर्दी करत पोलिसांच्या पाठलागाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गजबजलेल्या रस्त्यावर अशा प्रकारे वाहनांचा पाठलाग केल्याने निष्पाप नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला.

Dahanu Kasa Charoti Road Car Crash
FDA action in Palghar: पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयातील विनापरवाना उपाहारगृहावर कारवाई

या प्रकरणात पोलिसांनी चालक बिलाल आणि अक्षय मोहन शिरसाट यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, फरार चालकाचा शोध सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी समीर महेर आणि कासा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमर पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास कासा पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, नागरिकांनी केलेल्या पोलिसांच्या पाठलागासंदर्भातील आरोपांवर अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. तसेच या प्रकरणात पोलिसांच्या कार्यपद्धतीची स्वतंत्र चौकशी होणार का, याकडेही नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news