Palghar International Airport: समुद्रात ९ कोटी प्रवाशांचे विमानतळ; डीपीआरची प्रक्रिया सुरू

वाढवण बंदर, एक्स्प्रेस-वे, बुलेट ट्रेन, सी-लिंक अन् फ्रेट कॉरिडॉर एकाच हबला जोडणार
Palghar International Airport
Palghar International AirportPudhari
Published on
Updated on

श्रद्धा कांदळकर

ठाणे: मुंबई आणि नवी मुंबईनंतर आता मुंबई महानगर प्रदेशाच्या हवाई वाहतुकीला पालघरच्या समुद्रातून नवा 'टेकऑफ' देण्याची तयारी सुरू झाली आहे. पालघर जिल्ह्यातील कोरे बीचजवळ समुद्रात भराव टाकून प्रस्तावित असलेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सविस्तर तांत्रिक-आर्थिक व्यवहार्यता अभ्यास आणि सविस्तर प्रकल्प अहवालाची (डीपीआर) प्रक्रिया सुरू झाली आहे.

पूर्ण क्षमतेने विकसित झाल्यानंतर तब्बल ९ कोटी प्रवाशांची वार्षिक हाताळणी करण्याची क्षमता या महत्त्वाकांक्षी विमानतळाची प्रस्तावित आहे. विशेष म्हणजे हा केवळ विमानतळ राहणार नसून विमानतळ, वाढवण बंदर, महामार्ग, रेल्वे मालवाहतूक कॉरिडॉर यांना जोडणारे मोठे मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब म्हणून त्याची उभारणी करण्याचे नियोजन आहे.

Palghar International Airport
Bhiwandi Kamwari River Flood: कामवारी नदीच्या रौद्ररूपात पार्किग केलेली मिनीबस वाहून गेली

त्यामुळे पालघरच्या किनारपट्टीवर भविष्यात महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या वाहतूक आणि लॉजिस्टिक केंद्रांपैकी एक उभे राहण्याची शक्यता आहे. प्रस्तावित विमानतळ कोरे बीच परिसरातील समुद्रात भराव टाकून तयार करण्यात येणाऱ्या भूभागावर उभारण्याची संकल्पना आहे.

पूर्व-व्यवहार्यता अभ्यासात ही जागा प्रकल्पासाठी योग्य असल्याचे समोर आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जूनमध्ये या प्रकल्पासाठी डीपीआर तयार करण्याचे निर्देश दिले होते. विमानतळासाठी दोन धावपट्ट्यांची संकल्पना असून, २०५० पर्यंत मुंबई परिसरातील विमानतळांवर वाढणारा हवाई वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

प्रस्तावित विमानतळ आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक मानकांनुसार विकसित करण्याचे नियोजन आहे. दोन समांतर धावपट्ट्या, समांतर टॅक्सीवे, अत्याधुनिक प्रवासी टर्मिनल, कार्गो व लॉजिस्टिक हब, विमान देखभाल-दुरुस्ती सुविधा आणि व्यावसायिक विकास क्षेत्र उभारण्याची योजना आहे.

वाढवण बंदराच्या विकासासोबतच हा विमानतळ उभारला गेल्यास पालघरच्या किनारपट्टीवर बंदर-विमानतळ-महामार्ग-रेल्वे यांचे एकात्मिक वाहतूक जाळे निर्माण होऊ शकते. वाढवण बंदराशी संबंधित मालवाहतूक, लॉजिस्टिक्स, गोदामे, निर्यात-आयात व्यवसाय आणि औद्योगिक गुंतवणुकीला यामुळे मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.

Palghar International Airport
Raigad Fishing News: खोल समुद्रातील मासेमारीचा १०२ नाैकांनाच 'एक्सेस पास', उर्वरित वेटींगवर

समुद्रात उभी राहिलेली 'ऑफशोअर' विमानतळांची ‘अभियांत्रिकी बेटे’

जमिनीची कमतरता आणि वाढती हवाई वाहतूक यामुळे जगातील अनेक देशांनी समुद्रात भराव टाकून विमानतळ उभारले आहेत. जपानमधील कान्साई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जगातील पहिले पूर्णपणे समुद्रातील कृत्रिम बेटावर उभारलेले विमानतळ मानले जाते. जपानमध्ये च्युबु सेंट्रैर, किताक्यूशू आणि कोबे अशी अन्य ऑफशोअर विमानतळेही कार्यरत आहेत.

हाँगकाँगचे चेक लाप कॉक विमानतळ आणि मकाऊचे आंतरराष्ट्रीय विमानतळ यांचीही उभारणी समुद्रातील भराव किंवा कृत्रिम बेटावर करण्यात आली आहे. चीनमध्ये दालियान जिंझोउवान विमानतळ सुमारे २१ चौ.किमीच्या कृत्रिम बेटावर उभारले जात असून, पूर्ण झाल्यानंतर ते जगातील सर्वात मोठ्या ऑफशोअर विमानतळांपैकी एक ठरणार आहे.

तुर्कीतील ओर्दू-गिरेसुन विमानतळ हे काळ्या समुद्रात कृत्रिम बेटावर उभारलेले महत्त्वाचे विमानतळ आहे. समुद्रात विमानतळ उभारल्याने जमिनीचे अधिग्रहण आणि शहरातील ध्वनिप्रदूषणाचा त्रास कमी होतो; मात्र समुद्रपातळी वाढणे आणि भरावाची जमीन खचणे ही मोठी आव्हाने आहेत. त्यामुळे अशा विमानतळांच्या देखभालीसाठी मोठा खर्च करावा लागतो. पालघरच्या प्रस्तावित वाढवण ऑफशोअर विमानतळासाठीही याच तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news