

भिवंडी : मकर संक्रांतीच्या दिवशी उच्च विद्युत वाहिनीच्या तारेमध्ये पतंगाच्या मांज्याला अडकलेल्या कावळ्याला रेस्क्यू करण्यासाठी गेलेल्या अग्निशमन दलाच्या जवानास उच्च दाब विद्युत वाहिनीचा शॉक लागल्याने भिवंडी अग्निशमन दलाच्या एका जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर यावेळी एक जण गंभीर जखमी झाला आहे.
नितीन पष्टे (वय 50) असे मृत्यू झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानाचे नाव आहे. तर आसाराम आघाव हे गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान मुख्य अग्निशमन दल प्रमुख राजेश पवार यांना रुग्णालय परिसरातच मारहाण झाल्याची घटना घडली आहे.
शहरातील भादवड टेमघर परिसरातील उच्च विद्युत वाहिनीच्या तारेमध्ये सायंकाळच्या सुमारास पतंगाच्या मांज्यामध्ये कावळा अडकल्याची वर्दी भिवंडी अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर घटनास्थळी अग्निशमन जवान दाखल होत त्यांनी कावळ्याला सोडवण्याचे प्रयत्न फायबर काठीने कर्मचारी नितीन पष्टे यांनी सुरू केले.
येथील उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचा शॉक लागल्याने नितीन पष्टे यांचा जागेवर मृत्यू झाला असून त्यांच्या मदतीसाठी धावलेले जवान आसाराम आघाव हे शॉक लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर मृतदेह स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. गंभीर जखमी जवानास खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
या दुर्दैवी घटनेने अग्निशमन दलाच्या जवानांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अपुऱ्या सुविधा आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांचा संताप पाहायला मिळत आहे. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या जवानांकडून हळहळ, संताप व्यक्त केला आहे.