

कळंबोली : दीपक घोसाळकर
पनवेल महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कळंबोलीतील चार प्रभागाचे मतदान गुरुवारी सायंकाळपर्यंत शांततेमध्ये पार पडले एका मतदान केंद्रावर प्रारंभीच मतदान यंत्र बंद पडल्याने तब्बल दीड तास मतदान होऊ शकले नाही किरकोळ बाचाबाची चे प्रसंग वगळले तर कळंबोलीतील मतदान प्रक्रिया पूर्ण शांततेत पार पडली . कळंबोलीतील कारमेल हायस्कूलमध्ये मतदान सखी केंद्र हे सर्वांचेच आकर्षक ठरले. या केंद्रावरील मतदार सेल्फी तर घेतच होते. पण अन्य ठिकाणी मधीलही महिलावर्ग तेथे येऊन सेल्फी घेण्याचा त्यांना मोह आवरला नाही.मुदत संपण्यास आलेल्या मार्कर पेन ची चर्चाही सर्वत्र होत होती.
कळंबोली वसाहतीमध्ये पनवेल महापालिकेमधील सात, आठ, नऊ,दहा,असे चार प्रभाग असून यामध्ये 12 नगरसेवक निवडून जाणार आहे. या चारही प्रभागातील मतदारांसाठी सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या जुनी व नवी इमारत, न्यू इंग्लिश स्कूलच्या दोन इमारती,महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची एक इमारत,कारमेल शाळा व सेंट जोसेफ शाळा यामधून मतदान केंद्र निर्माण करण्यात आले होते.
या ठिकाणी सकाळपासून अत्यंत धीम्या गतीने मतदान काही अंशी सुरू होते.उन्हाचाही कडाका असल्यामुळे मतदार बाहेर पडण्यास उत्सुक नव्हते. मात्र दुपारनंतर मतदानाची टक्केवारी अचानक वाढू लागली. कळंबोली मध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या मारामारीच्या घटनेनंतर पोलीस प्रशासनही ॲक्शन मोडवर आले होते. त्यामुळे जादा पोलिसांची कुमक ही कळंबोलीतील सर्व मतदान केंद्राच्या बाहेर तैनात करण्यात आली होती.
या मतदान केंद्राच्या बाहेर किंवा जवळच मतदारांना मतदानाविषयी माहिती मिळावी यासाठी शासनाकडून बसवण्यात आलेल्या बीएलो ना विविध समस्यांना सामोरे जावे लागले. काहींना तर उन्हामध्येच काम करावे लागले. त्यांच्याकडे कोणीच लक्ष न दिल्याने नाष्टा चहापाणी व अन्नाशिवायही त्यांना राहावे लागले.तर काहींना स्वतःची व्यवस्था स्वतःच करावी लागली.
कळंबोलीतील प्रभाग सात हा जरा हाय व्होल्टेज ड्रामा घडणारा असाच ठरलेला होता. त्यामुळे या परिसरामध्ये जास्तच पोलिसांच्या बंदोबस्त तैनात केला होता. ज्या ठिकाणी मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणच्या दोन्ही बाजूचा परिसर हा सुरक्षेच्या उपायोजनासाठी बॅरॅकेट लावून बंद केल्यामुळे वाहन चालकांना आपले वाहन लांब लावून तेथून चालतच मतदान केंद्रापर्यंत यावे लागले. त्यातच मतदान केंद्राच्या आजूबाजूकडील सर्व दुकाने बंद केल्याने व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला.तसेच या परिसरातील हाउसिंग सोसायटी मधील राहणाऱ्या नागरिकांना ही विविध समस्यांना सामोरे जावे लागले.