पालघर : मोखाड्यात भरदिवसा विद्यार्थीनीची गळा चिरून हत्या | पुढारी

पालघर : मोखाड्यात भरदिवसा विद्यार्थीनीची गळा चिरून हत्या

मोखाडा

हनिफ शेख

पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम अशा मोखाडा तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. गुन्हेगारीपासून कोसो दूर असलेल्या मोखाडा शहरात भरदिवसा एका आश्रमशाळेत शिकणाऱ्या अर्चना उदार ( वय १८) या मुलीची अज्ञाताने कोयत्याने गळा चिरून हत्या केल्याची घटना घडलीय. त्यामुळे तालुक्यात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

संबंधित बातम्या –

आता पुन्हा एकदा आश्रमशाळांमधील मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्राथमिक तपासादरम्यान ही घटना प्रेमप्रकरणातून झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान, संशयित आरोपी प्रभाकर वाघरे (वय २२) फरार झाला असून मोखाडा पोलीस निरीक्षक धनंजय जगदाळे पुढील तपास करीत आहेत.

आश्रमशाळेत वर्गखोल्या कमी असल्याने या आश्रमशाळेपासून ५०० ते ६०० मीटर लांब असलेल्या महाविद्यालयात येथील ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना दररोज चालत नेण्यात येते. अशावेळी शिक्षक या मुलांसोबत असतात. मात्र, आज सकाळी मुली वर्ग संपवून जेवण्यासाठी पुन्हा महाविद्यालयाकडून आश्रमशाळेकडे येत असताना निर्मनुष्य असलेल्या कब्रस्तानाच्या पाठीमागेच प्रभाकर याने अर्चना हिला गाठले आणि धारदार कोयत्याने गळा चिरून हत्या केली. यावेळी तिच्या मैत्रीणीनी घाबरून आरडाओरडा केला. मात्र, काही लोक मदतीला धावण्याआधीच त्याने तिथून पळ काढला.

Back to top button