पालघरमधील २८ गावांसह ९१ पाड्यांत भीषण पाणीटंचाई

पालघरमधील २८ गावांसह ९१ पाड्यांत भीषण पाणीटंचाई
Published on
Updated on

पालघर; पुढारी वृत्तसेवा :  पालघर जिल्ह्यात आदिवासी भागामधील मोखाडा, जव्हार, वाडा आणि विक्रमगड तालुक्यात भीषण टंचाई जाणवू लागली असून पाण्यासाठी नागरिक भटकत आहेत. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २८ गावात व ९१ पाड्यांमध्ये ३८ टँकरद्वारे १३०.५ टँकरच्या फेऱ्या प्रतिदिन तेथील नागरिकांना पाणी पुरवण्यात येत आहे. मात्र, हे पाणी देखील अपुरे पडत असून नागरिकांना पाण्याच्या टँकरसाठी वाट पहावी लागत आहे. पावसाळा उशिरा सुरू झाल्यास येथील जनतेला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार आहे.

मान्सूनच्या आगमनाची तारीख निघून गेली आहे. पावसाने आजपर्यंत पाठ फिरवली असून अरबी समुद्रात चक्रीवादळ येऊन थडकले आहे. त्यामुळे हवामानात बदल झाल्याने गेले काही दिवस जमा झालेले ढग या वादळामुळे लांब निघून गेले. त्यामुळे पाऊस नेमका केव्हा येईल हे सांगणे कठीण आहे. तशातच शुक्रवारी हवामान विभागाने जारी केलेल्या निवेदनात समुद्रात ताशी १४५ ते १५५ किलोमीटर वारे वेगाने वाहून चक्रीवादळ धडकणार असल्याचे सांगण्यात आल्याने पावसाच्या सरींसाठी किती दिवस वाट पहावी लागणार आहे याबाबत नेमकी माहिती मिळत नसल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

जिल्ह्यात मोखाडा तालुक्यात २० गावे ५३ पाडे असून या गावात ३० हजार ३३४ लोकसंख्या आणि ९६३७ पशुधन अशा मिळून ३९ हजार ९८१ नागरिक व पशुधनाला २१ टँकरद्वारे दररोज ८७ फेऱ्या करून पाणी पुरविण्यात येत आहे. मात्र, हे पाणी देखील अपुरे पडत आहे. जव्हार तालुक्यातील आठ गाव व १७ पाडे येथील ११८०९ नागरिकांना व ५५० पशुधन अशा मिळून १७,३५१ जीविताना १३ टँकरद्वारे दररोज २३ फेऱ्या करून पाणीपुरवठा होत आहे. मात्र, उन्हाळ्याची प्रचंड उष्णता निर्माण झाल्याने व पाणी अपुरे असल्याने आधीच अंगाची काहिली होत असताना पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. टँकरद्वारे मिळणारे पाणीदेखील अपुरे असल्याचे नागरिकांची ओरड आहे.

वाडा तालुक्यात १७ गावपाडांमध्ये २११६ नागरिकांसाठी व १३८ पशुधनासाठी असे मिळून ३१५४ जीवांसाठी तेरा टँकरद्वारे साडेपाच टँकर प्रतिदिन फेऱ्या मारून नागरिकांसाठी व पशुधनासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, ही व्यवस्था अपूर्ण असून टँकरच्या फेऱ्या वाढवून मिळाव्यात तसेच अनेक देखील गावांमध्ये आजही पाणीटंचाई असल्याने त्या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांच्याकडून करण्यात येत आहे.

विक्रमगड तालुक्यातील चार गाव पाड्यांमध्ये ११०६ नागरिकांना व ५०९ पशुधन अशा मिळून ११६५१ जणांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याकरता तीन टँकर दिवसातून तीन फेऱ्या करून पाणीपुरवठा करण्याच्या काम करत आहेत. परंतु, हे पाणी देखील नागरिकांना आणि पशुधनाला अपुरे पडत आहे. त्यामुळे ते वाढवून मिळावे अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. नागरिक लवकरात लवकर पाऊस सुरू व्हावा या प्रतीक्षेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news