पालघर : वाडा उपविभागाच्या सहायक वनसंरक्षक लाचलुचपतच्या ताब्यात | पुढारी

पालघर : वाडा उपविभागाच्या सहायक वनसंरक्षक लाचलुचपतच्या ताब्यात

पालघर; नवीद शेख : वृक्षतोड परवाना मागणी पत्रावरून मालकी हक्क आणि निर्गत दाखला मंजुर करुन देण्यासाठी साठ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी वाडा उपविभागाच्या सहायक वनसंरक्षक वर्षाराणी खरमाटे आणि त्यांच्या वाहनचालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. सोमवारी (दि.12) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक नवनाथ जगताप यांच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

वृक्षतोड परवाना मागणी पत्रावरून मालकी हक्क आणि निर्गत दाखला मंजूर करुन देण्यासाठी सहाय्यक वनसंरक्षक वर्षाराणी खरमाटे (वय 40) यांनी तक्रारदाराकडे 60 हजार रुपयांच्या रकमेची मागणी केली होती. सहायक वनसंरक्षक आणि खासगी चालक मुरलीधर बोडके (वय 58) याने तक्रारदाराकडून साठ हजार रुपयांच्या रकमेची लाच स्वरूपात मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास, पोलीस हवालदार संजय सुतार, निशा मांजरेकर, नितीन पागधरे, योगेश धारणे, पोलीस शिपाई सखाराम दोडे आणि स्वाती तारवी यांनी केली.

हेही वाचा : 

Back to top button