Food Poisoned : मांसाहारी जेवणातून २३ जणांना विषबाधा; एकाचा मृत्यू, सात जणांवर उपचार सुरू | पुढारी

Food Poisoned : मांसाहारी जेवणातून २३ जणांना विषबाधा; एकाचा मृत्यू, सात जणांवर उपचार सुरू

तासवडे टोलनाका; पुढारी वृत्तसेवा : वहागाव (ता. कराड) येथे मांसाहारी जेवणातून 23 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यातील एकाचा मृत्यू झाला असून सातजणांवर कराड येथे खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. तर प्राथमिक उपचार करून 15 जणांना घरी सोडण्यात आले आहे. या घटनेने वहागावसह परिसरात खळबळ उडाली आहे. (Food Poisoned)

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील चव्हाण तसेच गटविकास अधिकारी मिनाताई साळुंखे यांनी वहागाव येथे भेट दिली. विषबाधा झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू करत तेथील जेवणाचे नमुने तपासणीसाठी घेतले.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, वहागाव येथील तुकाराम विठ्ठल राऊत यांच्या नातेवाईकाची शुक्रवारी दोन जूनला मांसाहारी जेवणाची देवाची यात्रा होती. त्यानिमित्त त्यांनी येतगाव (ता. कडेगाव), गोळेश्वर, अभयनगर, विंग तसेच स्थानिक वहागावमधील 35 पै-पाहुणे व नातेवाईकांना जेवणासाठी निमंत्रित केले होते. शुक्रवारी मांसाहारी जेवण झाल्यानंतर शनिवारपासून 35 जणांपैकी तुकाराम राऊत यांच्या कुटुंबीयांसह 23 जणांना उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागला. विषबाधा झालेल्या 23 जणांमध्ये वहागावमधील 11, येतगाव 4, गोळेश्वर 2, अभयनगर 3 व विंग येथील 3 जणांचा समावेश आहे.

उलट्या व जुलाबाचे प्रमाण वाढल्यामुळे तुकाराम राऊत, पत्नी सुनंदा तुकाराम राऊत आणि सचिन वसंत सोनुलकर यांना कराड येथे खाजगी रुग्णालयात उपचार करता दाखल केले. तसेच वहागाव येथील वसंत अण्णा सोनुलकर, गणेश बाळासो पवार, मनोहर जयवंत पवार, भामा वसंत सोनवलकर, लक्ष्मण ज्ञानदेव राऊत, अनिकेत लक्ष्मण राऊत, अण्णा लक्ष्मण सरगर, लक्ष्मण विष्णू सरगर आणि जयेश सदाशिव पवार यांना वहागाव आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात उपचारकरता दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, तुकाराम राऊत यांच्यावर कराड येथे उपचार सुरु असतानाच रविवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. पत्नी सुनंदा तुकाराम राऊत व सचिन वसंत सोनुलकर यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे वहागाव 2, येतगाव 2 आणि  विगं येथील 3 असे एकुण 7 जणांवर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील चव्हाण, कराड गटविकास अधिकारी मीनाताई साळुंखे, उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्नेहल कदम, वहागाव उपकेंद्राचे डॉ. गंगाधर माने यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत विषबाधा झालेल्यांना उपचार सुरू केले. आरोग्य विभागाकडून मासांहारी जेवण, भाकरी, पीठ, भात व पाण्याचे नमुने तपासण्यासाठी घेण्यात आले आहे. या तपासणीचा अहवाल दोन दिवसात येणार असून नक्की विषबाधा कशामुळे झाली हे निष्पन्न होऊ शकते असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Back to top button