पालघर, दिल्ली मिरचीची पिंपरी बाजारात आवक | पुढारी

पालघर, दिल्ली मिरचीची पिंपरी बाजारात आवक

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी मिरचीच्या पिकाचे उत्पादन घटल्याने बाजारात होणारी मिरचीची आवकही घटली आहे. त्यामुळे पालघर आणि दिल्ली शहरातील मिरची बाजारात विक्रीसाठी आली आहे. सोबतच आले आणि लसणाची देखील आवक घटली आहे. मात्र पालेभाज्यांची आवक अधिक असल्याने दर सामान्यांच्या आवाक्यात आले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी उपबाजार, पिंपरी येथील लाल बहादूर शास्त्री भाजी मंडई व आकुर्डी येथील किरकोळ बाजारात मिरची प्रतिकिलो 80 ते 90 रुपये दराने विक्री होत आहे. मिरचीची आवक बाहेरील राज्यामधून होत असल्याने वाहतूक खर्च वाढत असून दरात वाढ होण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली.

तसेच किरकोळ बाजारात प्रतिकिलोचे दर लसूण 100 ते 110, आले 110 ते 120, कांदा 25, बटाटा 30, पालेभाज्या (प्रतिपेंडी) ः पालक 10, मेथी 20, कोथिंबीर 20, कांदापात 10, पुदीना 10 रुपये दराने विक्री होत आहे. शेवग्याचा हंगाम असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात शेवग्याच्या शेंगेची आवक झाली आहे. त्यामुळे शेवगा 60 रुपये किलो दराने विक्री होत आहे.

तसेच घाऊक बाजारातील प्रतिकिलो दर मिरची 35, कांदा 8 ते 10, बटाटा 10, लसूण 35 ते 40, आले 35, टोमॅटो 10 ते 12, भेंडी 25, मटार 30 रुपये दराने विक्री होत आहे. मोशी उपबाजारात पालेभाज्यांच्या एकूण 45400 फळे 772 क्विंटल आणि फळ भाज्यांची आवक 3060 क्विंटल एवढी आवक झाली आहे.

शहर आणि राज्यातील मिरचीचे उत्पादन हंगाम नसल्याने घटले आहे. उष्णतेमुळे मिरचीचे पीक खराब होते. परिणामी बाजारात दिल्ली आणि पालघर येथून मिरचीच्या मालाची आयात होत आहे. वाहतूक खर्च वाढत असल्याने दरातही वाढ करावी लागत आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मिरचीचे दर वाढू शकतात.
                                                                               – ईश्वर गायकवाड, विक्रेता 

 

पिंपरी मंडईतील पालेभाज्यांचे
किरकोळ भाव
पालेभाज्या दर (प्रती पेंडी)
मेथी 20
कोथिंबीर 20
कांदापात 10
शेपू 10
पुदिना 10
मुळा 15
चुका 15
पालक 10

Back to top button