

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा
स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या काळात विविध कार्यकारी संस्थांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. त्यापैकी अनेक संस्था आजही प्रामुख्याने कर्जवाटपाचेच कार्य करताना दिसतात. मात्र, आजही इतर व्यवहार यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक असणारे व्यवस्थापन कौशल्य वाढविण्याचा प्रयत्न झाल्याचे यात दिसत नाही. त्यामुळे संचालकांनी कर्जवाटप करणे एवढेच आपले काम न ठेवता कामाच्या कक्षा विस्ताराव्यात, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
येवला येथील महात्मा फुले नाट्यगृह येथे विविध कार्यकारी सोसायटी संचालकांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. ना. भुजबळ म्हणाले, जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत एकूण 435 विविध कार्यकारी सोसायटी अनिष्ट तफावतीत होत्या. या संस्थांचा कर्जपुरवठा बंद करण्यात आला होता. यामध्ये येवला तालुक्यातील 23 संस्थांचा समावेश आहे. याबाबत बैठक घेऊन हा प्रश्न सोडविण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वतीने राबविण्यात आलेली महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत येवला तालुक्यातील 18 हजार 642 शेतकर्यांना 176 कोटी रुपयांच्या अनुदानाचा लाभ मिळालेला आहे.
केंद्रात कृषिमंत्री पदाचा कारभार सांभाळताना खा. शरद पवार यांनी केंद्राच्या वतीने 3 टक्के व्याज परतावा योजना सुरू केली. त्यामुळे मुदतीत कर्जफेड शेतकर्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करणे शक्य झाले आहे. आता केंद्र शासनाने शेतकर्यांच्या हिताचा विचार करून ही योजना बंद करू नये, असे असे सांगितले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, तहसीलदार प्रमोद हिले, सहायक निबंधक प्रताप पाडवी, मुख्याधिकारी मुतकेकर, सभापती संजय बनकर अरुण थोरात, राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, प्रा. गणेश शिंदे, वसंत पवार, साहेबराव मढवई, भाऊसाहेब भवर, प्रकाश वाघ आदी उपस्थित होते.