

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने पोलिस प्रशासनाने तयारीस सुरुवात केली आहे. त्यानुसार मंडळांना विविध परवानगी देण्यासाठी एक खिडकी योजना राबवली जाणार आहे. त्याचप्रमाणे दोन वर्षे कोरोनामुळे उत्सवांवर अनेक मर्यादा, निर्बंध होते. मात्र, आता निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्याची तयारी गणेशोत्सव मंडळांनी केली आहे.
राज्यातील राजकीय घडामोडी, सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टमुळे झालेल्या घटनांमुळे पोलिस यंत्रणा सतर्क होती. शहरात कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. श्रावणमास सुरू झाल्यानंतर अनेक सण-उत्सव येत असल्याने बंदोबस्ताचे नियोजन पोलिसांकडून होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सव निर्बंधमुक्त वातावरणात होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यातील मंडळांनी उत्सवाची तयारी सुरू केली आहे. येत्या 31 ऑगस्टला गणेशोत्सव असल्याने यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उत्साहात दिसत असून, वाजत गाजत गणरायाचे आगमन करण्याची त्यांची इच्छा आहे. पोलिसांकडूनही त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने यंदा निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव मोठ्या दणक्यात साजरा होण्याची चिन्हे आहेत. सार्वजनिक मंडळांसोबतच पोलिसांनीही नियोजनाची तयारी सुरू केली आहे.
पोलिसांची तयारी आणि नियमावली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शासकीय निर्णयानुसार गणेशोत्सव होईल. सार्वजनिक मंडळांना आवाजाच्या डेसिबलची मर्यादा पाळावी लागेल. रस्त्यात मंडप असलेल्या मंडळांना ना हरकत दाखला घेणे अनिवार्य असेल. आवश्यकतेनुसार वाहतूक नियोजन करण्यात येणार आहे.
डीजेसह सर्व परवानग्या एकाच ठिकाणी द्या- 'नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळाची मागणी'
गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक मंडळांना दरवर्षीप्रमाणे देण्यात येणार्या परवानग्या तशाच ठेवाव्यात, डीजे वाजवण्यास मान्यता द्यावी, एक खिडकी योजनेंतर्गत सर्व परवानग्या एकाच ठिकाणी द्याव्यात, अशा विविध मागण्या नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकार्यांनी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्याकडे केल्या आहेत.
मंडळांच्या पदाधिकार्यांनी पोलिस आयुक्त नाईकनवरे यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यंदा गणेश भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे पोलिसांनी सहकार्य करण्याची अपेक्षा पदाधिकार्यांनी व्यक्त केली आहे. त्यात मिरवणूक संपेपर्यंत वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी, वाहतूक व पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करावे, गणेश मंडळांना परवानगी देताना कागदपत्रांसाठी अडवणुकीचे धोरण बाळगू नये, यासाठी सर्व परवानग्या एकाच ठिकाणी द्याव्यात, अशीही मागणी पदाधिकार्यांनी केली आहे. गणेशोत्सवानिमित्त मंडप टाकण्याची परवानगी मिळावी. स्थानिक पोलिसांना सर्व परवानग्या देण्याचे अधिकार द्यावेत, एक खिडकी योजना सुरू करून त्यामार्फत पोलिस, महापालिका, वाहतूक शाखा, अग्निशमन दलाचे अधिकारी नेमावेत, जेणेकरून सर्व विभागांच्या परवानगी एकाच ठिकाणी मिळतील व मंडळांच्या अडचणी सोडवण्यासाठी पोलिस आयुक्तालयामार्फत एक अधिकारी नेमण्याची मागणी पदाधिकार्यांनी केली आहे. यावेळी पोलिस आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी बैठक बोलवली जाईल, असे आश्वासन दिले. पोलिस आयुक्तांना निवेदन देताना नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, गजानन शेलार, विनायक पांडे, राजेंद्र बागूल, हेमंत जगताप, पोपटराव नागपुरे, महेश महंकाळे आदी उपस्थित होते.