जळोची : एमआयडीसीतील कर्मचार्‍यांचे आरोग्य महत्त्वाचे: खा. शरद पवार यांचे मत | पुढारी

जळोची : एमआयडीसीतील कर्मचार्‍यांचे आरोग्य महत्त्वाचे: खा. शरद पवार यांचे मत

जळोची; पुढारी वृत्तसेवा: बारामतीमध्ये कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे सुसज्ज हॉस्पिटल मंजूर होण्यासाठी केंद्रीय मंर्त्यांशी चर्चा करू. परंतु, देशातील प्रत्येक एमआयडीसीमधील कर्मचार्‍याचे आरोग्य महत्त्वाचे आहे, असे मत खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.
बारामती इंडस्ट्रिअल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (बिमा) अध्यक्ष धनंजय जामदार, सचिव अनंत अवचट, सदस्य महादेव गायकवाड, अंबीरशाह शेख, संभाजी माने, शिवराज जामदार आदींच्या शिष्टमंडळाने पवार यांची बुधवारी (दि. 10) भेट घेत एमआयडीसीतील समस्यांबाबत चर्चा केली.

केंद्र शासनाअंतर्गत कर्मचारी राज्य विमा महामंडळाकडे बारामती परिसरातील नोंदणीकृत कामगारांची मोठी संख्या विचारात घेता बारामतीमध्ये ईएसआयसी रुग्णालय होणे गरजेचे आहे. याबाबत आपण केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी चर्चा करू. बारामतीच्या विस्तारित एमआयडीसीमध्ये ऑटोमोबाईल क्षेत्रातील एखादा मोठा उद्योग आणण्याचा सकारात्मक विचार करू, असेही पवार म्हणाले. कर्मचारी राज्य विमा महामंडळ कायदा बारामती परिसराला 2016 पासून लागू करण्यात आलेला असून, या कायद्यानुसार आस्थापना व कामगार मिळून वेतनाच्या साडेसहा टक्के रक्कम ईएसआयसीकडे भरावी लागते. या माध्यमातून विमा महामंडळाने कोट्यवधी रुपये आजपर्यंत वसूल केले आहेत.

यातून कामगार व त्याच्या कुटुंबीयांना विनामूल्य दर्जेदार वैद्यकीय सेवासुविधा उपलब्ध करून देणे महामंडळावर बंधनकारक आहे. परंतु, विमा महामंडळाचे बारामतीत हॉस्पिटल नसल्यामुळे कामगारांना या हक्काच्या वैद्यकीय सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. काही खासगी हॉस्पिटलबरोबर महामंडळाने करार केले आहेत. परंतु, त्यांच्या सेवा खर्चीक व असमाधकारक असल्याच्या कामगारांच्या तक्रारी आहेत. यामुळे नाइलाजास्तव कामगारांना उपचारांसाठी पुण्यातील ईएसआयसी रुग्णालयात जावे लागते. ही बाब धनंजय जामदार व त्यांच्या सहकार्‍यांनी पवार यांच्या निदर्शनास आणून दिली.

रोजगारनिर्मितीसाठी हवा मोठा उद्योग
बारामतीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ औद्योगिक क्षेत्राचा विस्तार करीत आहे. नवीन जागेवर ऑटोमोबाईल क्षेत्रातील एखादा मोठा उद्योग आणल्यास बारामतीमधील लघुउद्योगांना निश्चित चालना मिळेल, रोजगारनिर्मिती होईल. त्यामुळे नवीन कंपन्या येणे अत्यंत गरजेचे आहे, असेही धनंजय जामदार यांनी सांगितले.

Back to top button