

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
एका बेशिस्त वाहनचालकाने वाहतूक पोलिसाकडील ई-चलन मशीन हिसकावून त्याची तोडफोड केली. त्याचप्रमाणे पोलिसांना शिवीगाळही केली. चालकास ताब्यात घेतले असता, त्याने पोलिस ठाण्यातही एका पोलिसावर रॉडने हल्ला करीत दुखापत केल्याची घटना घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रितेश अशोक ललवाणी (30, रा. मधुकमलनगर, सावरकरनगर) असे या संशयिताचे नाव आहे. साहेबराव आर. गवळी हे सोमवारी (दि.20) टिळकवाडी येथील जलतरण तलावाजवळ सेवा बजावत होते. त्यावेळी एमएच 15 एफएक्स 0990 क्रमांकाच्या दुचाकीवरून रितेश विनाहेल्मेट आला होता. त्यामुळे गवळी हे त्याच्यावर ई-चलनमार्फत दंडात्मक कारवाई करत होते. त्यावेळी रितेशने गवळी यांना शिवीगाळ, मारहाण करीत त्यांच्याकडील ई-चलन मशीन हिसकावून फोडले. त्यावेळी वाहतूक पोलिस अंमलदार संजय जगताप, मुंबईनाका पोलिस ठाण्याचे दोन अंमलदार तेथे आले. त्यांनाही रितेशने शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. अखेर पोलिसांनी त्यास पकडून सरकारवाडा पोलिस ठाण्यात नेले. मात्र, तेथेही रितेशने लोखंडी रॉड उचलून पोलिस अंमलदार योगेश वायकंडे यांना मारले. त्यात योगेश यांच्या हाताला दुखापत झाली. तेथेही रितेशने आरडाओरड करीत शिवीगाळ केली. त्यामुळे गवळी यांच्या फिर्यादीनुसार रितेशविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास अटक केली आहे.
घटनास्थळी बघ्यांची गर्दी
रितेशने टिळकवाडी येथे आरडाओरड करीत पळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्यास पकडले होते. त्यामुळे तेथे बघ्यांची गर्दी जमली होती. पोलिसांनी त्यास पोलिस ठाण्यात नेले त्यानंतर गर्दी पांगली.