काँग्रेस, शिवसेनेलाही फंदफितुरीची जोरदार चर्चा | पुढारी

काँग्रेस, शिवसेनेलाही फंदफितुरीची जोरदार चर्चा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  विधानपरिषद निवडणुकीत गुप्‍त मतदानामुळे महाविकास आघाडीतील फंदफितुरी स्पष्ट झाली आहे. आघाडीला पाठिंबा देणार्‍या छोट्या पक्षांची मते तर फुटलीच पण काँग्रेस आणि शिवसेनेची प्रत्येकी तीन, पाठिंबा देणारे अपक्षही फुटल्याचे स्पष्ट झालेे.

महाविकास आघाडीत शिवसेनेची 55, राष्ट्रवादी काँग्रेसची 53 आणि काँग्रेसची 44 मिळून 152 मते आहेत. मात्र महाविकास आघाडीच्या सर्व सहा उमेदवारांना मिळून पाहिल्या पसंतीची 146 मते मिळाली. त्यामुळे मविआच्या तीन प्रमुख पक्षांची 6 मते फुटली आहेत. शिवाय महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे छोटे पक्ष आणि अपक्ष अशी 21 मते फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा धक्‍का आहे.
राज्यसभा निवडणुकीत भाजपने बहुजन विकास आघाडी, अपक्ष देवेंद्र भुयार, शामसुंदर शिंदे, संजयमामा शिंदे आदी 7 मते फुटल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. या निवडणुकीत मते फुटू नयेत म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रणनीती आखली होती. पण ती पूर्णपणे अपयशी ठरली. राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र सेफ गेम केला. त्यांचे 53 आमदार आहेत. त्यापैकी नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानाची संधी मिळाली नाही. त्यामुळे हे संख्याबळ 51 वर आले होते. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांनी 57 मते मिळविली.

शिवसेना आमदारांची आज तातडीची बैठक
दरम्यान, या निवडणुकीत महाविकास आघाडीत झालेल्या फंदफितुरीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (दि.21) तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

मतांवर एक नजर…
भाजप ः प्रवीण दरेकर (29), श्रीकांत भारतीय (30), राम शिंदे (30), उमा खापरे (27), प्रसाद लाड (28)
राष्ट्रवादी ः एकनाथ खडसे (29), रामराजे नाईक
निंबाळकर (28)
शिवसेना ः सचिन अहिर (26), आमशा पाडवी (26)
काँग्रेस ः भाई जगताप (26), चंद्रकांत हंडोरे (22)

Back to top button