नाशिक : मनपाच्या 69 शाळा होणार स्मार्ट, गुणवत्तेसोबतच मिळणार नयनरम्य वातावरण

नाशिक : मनपाच्या 69 शाळा होणार स्मार्ट, गुणवत्तेसोबतच मिळणार नयनरम्य वातावरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महापालिका आपल्या एक, दोन नव्हे, तर चक्क 69 शाळांचे स्मार्ट स्कूलमध्ये रूपांतर करणार आहे. यामुळे महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनाही चांगल्या गुणवत्तेबरोबरच नीटनेटक्या आणि नयनरम्य वातावरणातील शाळांची अनुभूती घेता येणार आहे. या आधी महापालिका सहा विभागांत प्रत्येक एक याप्रमाणे सहा शाळांमध्ये स्मार्ट स्कूल उपक्रम राबविणार होती.

खासगी शिक्षणसंस्थांच्या तुलनेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये आपल्या पाल्याला शिक्षणासाठी दाखल करण्याकडे पालकांचा ओढा नसतो. खासगी शाळेतील शुल्क परवडण्याजोगे नसल्याने गोरगरीब आणि सामान्य कुटुंबातील पालक आपल्या पाल्यांना महापालिकेच्या शाळेमध्ये दाखल करत असतात. शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पटसंख्याही फारशी नसते. त्यामुळे महापालिकेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनादेखील दर्जेदार शिक्षण मिळावे आणि खासगी शिक्षणसंस्थेशी स्पर्धा करेल अशा शाळा, वर्ग मिळावेत, या दृष्टीने महापालिकेच्या शिक्षण विभागाने स्मार्ट स्कूल उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला असून, त्यासंदर्भातील काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात मनपाच्या सहा विभागांत प्रत्येकी एक अशा सहा स्मार्ट स्कूल सुरू करण्यात येणार होत्या. परंतु, आता 69 शाळांचे रूपांतर स्मार्ट स्कूलमध्ये होणार आहे. महापालिकेच्या एकूण 101 इतक्या शाळा असून, त्यापैकी 88 प्राथमिक तर 13 माध्यमिक शाळांमध्ये सुमारे 28 हजार विदयार्थी शिक्षण घेत आहेत.

स्मार्ट स्कूल शाळांसाठी 150 कोटींच्या निधीची गरज पडणार आहे. त्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीकडे 80 कोटी रुपयांची मागणी करण्यात येणार असून, त्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे काम शिक्षण विभागाकडून सुरू आहे. आयुक्त रमेश पवार यांच्यामार्फत प्रस्ताव कंपनीकडे सादर केला जाईल. त्याचबरोबर उर्वरित 70 कोटी रुपये सीएसआर फंडाद्वारे उभे केले जाणार आहेत.

काय असेल स्मार्ट स्कूलमध्ये
स्मार्ट स्कूल उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेच्या क्लासरूमध्ये इंटरअ‍ॅक्टिव्ह बोर्ड, संगणक, प्रोजेक्टर, सीसीटीव्ही असेल. तसेच मुलांना टॅब देण्याचादेखील विचार केला जात असून, शाळेत येणार्‍या प्रत्येक मुलाची हजेरी ही डिजिटल स्वरूपात घेतली जाणार आहे. त्याचबरोबर पाठ्यक्रम आणि शालेय साहित्य ई-कंटेंटच्या स्वरूपात देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांनी दिली.

परिसरात 'मियावॉकी फॉरेस्ट'
मोकळी जागा असलेल्या प्रत्येक स्मार्ट स्कूलमध्ये जॅपनीज तंत्रज्ञान असलेल्या 'मियावॉकी फॉरेस्ट'ची संकल्पना राबविण्यात येणार आहे. सर्वसाधारण झाडाची उंची वाढण्यासाठी किमान 10 वर्षांचा कालावधी लागतो. या संकल्पनेत किमान तीन वर्षांत झाडांची उंची वाढते. त्यासाठी देशी प्रजातीचीच 110 वृक्ष उपलब्ध आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news