ती चित्तथरारक काळरात्र..! गोष्ट पाठलागाच्या थराराची…..

ती चित्तथरारक काळरात्र..! गोष्ट पाठलागाच्या थराराची…..

शशिकांत पवार : नगर : पोलिस म्हणलं की त्यांच्यावर नेहमीच टीका, आरोप होत असतात… पोलिस घटनास्थळी नेहमीच उशिरा दाखल होतात… पोलिसांचा धाक कमी झाल्याने गुन्हेगारी चोर्‍या वाढत आहेत… असे नानाविध आरोप पोलिस खात्यावर नेहमीच केले जातात. पण, पोलिस आपले कर्तव्य बजावताना जीवाची तमा, संसाराची पर्वा न करता कोणत्या परिस्थितीत संकटाला सामोरे जातात, याचा अनुभव शुक्रवारी  पहाटे एक पत्रकार म्हणून समक्ष पाहावयास व अनुभवयास आला. त्या चित्तथरारक प्रसंगाने अंगावर अक्षरशः शहारे उभे राहतात..

औरंगाबाद महामार्गावर जेऊर परिसरात पहाटे दोनच्या सुमारास पिकअप (एम. एच. 42 ए.क्यू 5013) म्हशींसह पळवून नेण्यात आली. घोडेगाव जनावरांच्या आठवडे बाजारात विक्रीसाठी म्हशी घेऊन जात असताना, लाल पल्सर गाडीवरून आलेल्या तीन आरोपींनी गावठी कट्ट्याचा धाक दाखवित चालकावर चॉपरने वार करत पिकअप व्हॅन पळविली. पिकअप चालक व त्याच्या साथीदारांचे मोबाईल, पैसे व इतर कागदपत्रे घेऊन पलायन केले.

महामार्गालगत राहणार्‍या जेऊर येथील माजी ग्रामपंचायत सदस्य विजय पाटोळे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी पत्रकार म्हणून घटनेची माहिती दिली. मी घटनास्थळी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास आल्यानंतर एमआयडीसी पोलिसांना घटनेबद्दल कल्पना दिली. त्याच वेळी महामार्गावर लुटण्याच्या प्रकारामुळे स्थानिक गुन्हे शाखेची गस्त घालत असलेली गाडी गर्दी पाहून थांबली. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ तपास यंत्रणा सुरू केली.

पत्रकार म्हणून मीही गाडीत बसलो. चालू गाडीतूनच चोरी गेलेल्या मोबाईलचे लोकेशन, नेवासा, राहुरी, सोनई, एमआयडीसी पोलिसांशी संपर्कात राहून चोरीला गेलेल्या वाहनाचा तपास सुरू झाला. सुरुवातीला राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी गावातील लोकेशन मिळाल्यानंतर ब्राह्मणी परिसरातील सर्व रस्ते पिंजून काढले. आरोपींकडे गावठी कट्टा असल्याने मनात भीती होती. परंतु, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे, उमाकांत गावडे, सागर ससाणे, रोहित येमोल, महावीर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे हे अनोळखी जागेवर अंतर्गत रस्त्याने फिरत आरोपींचा शोध घेत होते. एमआयडीसी पोलिसही ब्राह्मणी शिवार पिंजून काढत होते.

परंतु, नंतर लोकेशन दाखविण्यात येत नसल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शनिशिंगणापूर मार्गे पहाटे पाचच्या सुमारास घोडेगावकडे निघाले. शनिशिंगणापूर येथे येत असताना डिझेल चोरी प्रकरणातील आरोपी नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय करे यांच्या अंगावर स्विफ्ट डिझायर गाडी घालून पळून जात असल्याची नवी माहिती समजली. लगेच स्थानिक गुन्हे शाखा व नेवासा पोलिसांचे पथक स्विफ्ट डिझायर गाडीच्या शोधात निघाले.

नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती पब्लिक स्कूल परिसरात डिझेल चोरत असताना सिव्हिल ड्रेसवर असणारे पोलिस निरीक्षक विजय करे स्विफ्ट गाडीला आडवे उभे राहून गाडीला थांबविण्याचा इशारा करत होते. त्याच वेळी त्यांच्या अंगावर गाडी घालत आरोपींनी घोडेगावच्या दिशेने पलायन केले. पोलिस निरीक्षक करे यांच्या गुडघ्याला जबर मार लागला असून, ते गंभीर जखमी झाले होते. अशाही परिस्थितीत त्यांनी डिझेल चोरांच्या गँगचा छडा लावायचाच या उद्देशाने पाठलाग सुरू केला.

त्यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सोनई परिसरात असल्याची कल्पना असल्याने त्यांनी त्या पथकाला घटनेची माहिती दिली. नेवासा फाट्यावरुन आरोपी भेंडा, भानसहिवरा असा मार्ग बदलत पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी माळीचिंचोरा फाटा ते घोडेगाव रोडवर नेवासा पोलिसांच्या पथकाचा सुरू असलेला पाठलागाचा खेळ एक तास सुरु होता.

शनिशिंगणापूरमधून एलसीबीचे पथक स्विफ्टच्या शोधार्थ निघताक्षणी चौकातच त्यांना डिझेल चोरणार्‍या टोळीची गाडी दिसली. आरोपींनी सिव्हिल ड्रेसवरच्या पोलिसांना ओळखून स्विफ्ट घोडेगावच्या दिशेने सुसाट वेगाने पळविली. अन् येथेच सुरू झाला पोलिस व आरोपींचा फिल्मी स्टाईल पाठलाग. घोडेगाव चौकात लावलेले बॅरिकेट उडवून देत आरोपींनी गाडी नगरच्या दिशेने काढली.

त्यांच्या पाठीमागे एलसीबीचे पथक, तसेच नेवाशावरुन येणारे पथक. नगर-औरंगाबाद महामार्गावरुन पाठलाग सुरु असताना एमआयडीसी पोलिसांना कल्पना देण्यात आल्याने त्यांनी टोल नाक्यावर रस्ता बंद केला होता. जेऊरचे हर्षल तोडमल व आकाश तोडमल यांना जेऊर येथेच वाहने आडवे लावून महामार्गावर नाकाबंदी करण्यास पत्रकार पवार यांनी कळविले.

परंतु, आरोपींनी गाडी पांढरी पूल येथून वांजोळी रस्त्याला वळविली. त्यांच्या पाठीमागे पोलिसांचा ताफा. हे चित्र पाहून परिसरातील नागरिकांनाही नेमका काय प्रकार सुरू आहे तो समजेना. वांजोळी ते मोरेचिंचोरे याच्यामध्ये आरोपी गाडी चालकाने चालू गाडीतून उडी मारून उसात पलायन केले. गाडी कडेला बाभळीच्या झाडावर जाऊन आदळली.

दुसरा आरोपी पळून जात असताना दत्तात्रय गव्हाणे व रोहित येमोल यांनी त्याचा पाठलाग करून पकडले. त्यानंतर घटनास्थळी नेवासा पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजय करे व त्यांचे पथक तसेच एमआयडीसी पोलिस हजर झाले. सुमारे दोन तास स्थानिक नागरिक व पोलिसांनी दुसर्‍या आरोपीचा उसाच्या शेतात शोध घेतला.

परंतु, तो पसार झाला आहे. स्विफ्ट गाडीमध्ये डिझेलचे ड्रम व इतर साहित्य आढळून आले आहे. त्यानंतर पोलिस आरोपीला घेऊन पुढील तपासासाठी निघून गेले. त्यावेळी सकाळचे आठ वाजले होते. पहाटे दोन वाजता सुरू झालेला हा चित्तथरारक प्रवास सकाळी आठ वाजता संपला.

नगर-औरंगाबाद महामार्गावर डिझेल चोरीची प्रकरणे वाढत होते. त्यामुळे आम्ही सिव्हील ड्रेस व खाजगी वाहनातून पाळत ठेवून होतो. आरोपींनी अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मी सावधगिरी दाखवित स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न केला. गुडघ्याला जबर मार लागला असला तरी, झालेल्या जखमेपेक्षा आरोपींचा छडा लावल्याने जास्त समाधान मिळाले.
विजय करे
पोलिस निरीक्षक, नेवासा

सलाम 'त्या' कार्यकर्तृत्वाला

नेवासा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय करे गंभीर जखमी झाले असताना, कर्मचारी त्यांना उपचार घेण्यास सांगत होते. परंत, त्यांनी उपचार नंतर अगोदर आरोपी पकडायचेच, ही जिद्द मनात ठेवून जखमी अवस्थेत आरोपींचा पाठलाग केला. असे कर्तव्यनिष्ठ अधिकारी पाहून नागरिकांनीही त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

स्थानिक गुन्हे शाखेची कार्यतत्परता

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सर्व तपासाची चक्रे चालू गाडीतूनच फिरवत होते. विविध आरोपींचे लोकेशन, सर्वत्र पोलिस स्टेशनशी संपर्क, जीवाची तमा न बाळगता आरोपींना पकडण्यासाठी करत असलेली धडपड. आरोपींकडे गावठी कट्टा असल्याची माहिती असूनही न डगमगता घेतलेले निर्णय. एकंदरीत एलसीबी टीमची कार्यत्परता व निर्णय क्षमतेमुळेच आरोपी पकडला गेला.

चालकांची मोठी कसरत
एलसीबीचे वाहन चालक दत्तात्रय गव्हाणे व उमाकांत गावडे यांना मोठी कसरत करावी लागत होती. आरोपीच्या गाडीचा पाठलाग करताना आरोपी कोणत्याही दिशेला वळत होते. आहे त्याच वेगात या चालकांना देखील वाहन वळवावे लागत होते. या वाहन चालकांनी आरोपी पकडूनच घटनेचा चांगला शेवट केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news