

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून त्याचे बनावट साठेखत तयार करून तोच फ्लॅट परस्पर दुसऱ्याला विकून पाच संशयितांनी महिलेची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. न्यायालयाच्या आदेशानुसार उपनगर पोलिस ठाण्यात संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
कविता किरण धोंगडे (रा. दत्तमंदिर रोड, नाशिकरोड) यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली. कविता यांच्या फिर्यादीनुसार संशयित महेश गंगवाणी, विजय गंगवाणी, दिलीप गंगवाणी (तिघे रा. कृपा लॉजिंग, दत्तमंदिर रोड), मधु लक्ष्मण महताणी (रा. दत्तमंदिर रोड) व नितीन मधुकर जगळे (रा. जगताप मळा, नाशिकरोड) यांनी एप्रिल ते जून २०११ या कालावधीत गंडा घातला. कविता यांनी संशयितांसोबत शिवाजी धोंगडे मार्गावरील हिमगिरी हाइट्स या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर फ्लॅट खरेदी करण्यासाठी व्यवहार केला. संशयितांनी फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून बनावट साठेखत करून कविता यांच्याकडून तीन लाख रुपये घेतले. मात्र, पैसे घेऊनही संशयितांनी फ्लॅटची परस्पर विक्री केली.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कविता यांनी पोलिसांकडे धाव घेतली. मात्र, पोलिसांनी तक्रार नोंदविण्यास नकार दिल्याने कविता यांनी न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाच्या आदेशानुसार उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.