

दीपेश सुराणा
पिंपरी : शहरामध्ये पुढील 20 वर्षांत होणारा विकास, लोकसंख्यावाढ आणि वाढत्या नागरीकरणाच्या गरजा लक्षात घेऊन सुधारित विकास आराखडा तयार करण्याचे काम सध्या वेगात सुरू आहे. समाविष्ट गावांच्या वाढीव हद्दीचा आराखडा, ताथवडे हद्दीचा आराखडा, प्राधिकरणाचा आराखडा आणि मूळ विकास आराखडा, अशा चार आराखड्यांना यामध्ये एकत्रित केले जात आहे. त्याशिवाय, प्राधिकरणाच्या विलिनीकरणामध्ये काही भाग महापालिका हद्दीत आला आहे. त्या परिसराचाही आराखड्यात समावेश केला जाणार आहे.
सध्या जमीन वापराचा नकाशा बनविण्यात आला आहे. त्यात पिंपरी-चिंचवड शहराचे एकूण क्षेत्र 177 चौरस किलोमीटर इतके आहे. 17 हजार 312 हेक्टर इतकी एकूण जागा आहे. त्यामध्ये सर्वाधिक 4 हजार 893 हेक्टर इतके क्षेत्र रहिवासी आहे. त्या खालोखाल 3 हजार 573 हेक्टर क्षेत्र मोकळ्या जागांचे आहे. तर, शेती (ना विकास क्षेत्र) क्षेत्र 2 हजार 941 हेक्टर इतके आहे.
सुधारित विकास आराखड्याच्या कामासाठी डिझाईन प्लॅनिंग अॅण्ड मॅनेजमेंट अहमदाबाद प्रायव्हेट लिमिटेड या सल्लागार कंपनीची 8 मार्च 2019 रोजी नियुक्ती करण्यात आली. प्रत्यक्ष आराखड्याचे काम 20 नोव्हेंबर 2019 पासून सुरू झाले. त्यासाठी जानेवारी 2020 मध्ये नगररचना अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली. कोवीडमुळे 22 मार्च 2020 ते 27 नोव्हेंबर 2021 हा कालावधी वगळून कामासाठी मुदतवाढ देण्यात आली. दरम्यान, सद्यःस्थितीत विद्यमान जमीन वापराचा नकाशा तयार केलेला आहे. तसेच, जीआयएस मॅपिंगनुसार काम सुरू केले आहे. प्रस्तावित जमीन वापर निश्चित करण्यासाठी 2 वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे.
महापालिका आणि विविध विभागांच्या मागणीनुसार या आराखड्यात मुलभूत नागरी सुविधांसाठी आरक्षणे टाकण्यात येणार आहे.
सद्यःस्थितीत विकास आराखड्यात 1179 आरक्षणे आहेत.
2041 या वर्षापर्यंत होणारी अंदाजे 61 लाख इतकी लोकसंख्या वाढ लक्षात घेऊन सुधारित विकास आराखडा तयार करण्याचे काम करण्यात येत आहे. सध्या विद्यमान जमीन वापराचा नकाशा तयार केला आहे. प्रस्तावित जमीन वापराचा नकाशा बनविण्यासाठी पुढील दोन वर्षांचा कालावधी दिलेला आहे. मात्र, पुढील सहा महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
-विजय शेंडे, उपसंचालक, नगररचना, विकास योजना, पिंपरी-चिंचवड मनपा विशेष घटक