नाशिक : पेव्हरब्लॉकची आयडियाही खड्ड्यात, पावसामुळे दैना

कॅनडा कॉर्नर
कॅनडा कॉर्नर
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पाऊस आणि खड्डे हे जणू काही समीकरणच झाले आहे. विशेष म्हणजे पावसाळा सुरू होण्याच्या काही दिवस अगोदरच रस्त्यांची कामे युद्धपातळीवर केली जातात. मात्र, या रस्त्यांची काही दिवसांतच चाळण होत असल्याने, नव्या कोर्‍या रस्त्यांवर वाहने चालविण्याचे नागरिकांचे स्वप्न औटघटकेचे ठरते. सध्या शहरातील सर्वच नवे-जुने रस्ते खड्ड्यांत गेले असून, खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाकडून राबविली जात असलेली पेव्हरब्लॉकची आयडिया पूर्णपणे फोल होताना दिसत आहे.

शरणपूररोड
शरणपूररोड
नासर्डी ब्रीज
नासर्डी ब्रीज
तिडके कॉलनी
तिडके कॉलनी

जुलै महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात शहर व परिसरात पावसाच्या जोरदार सरी बरसल्याने शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली. सोबतच पुन्हा एकदा ठेकेदारांचे पितळही उघडे पडले. जागोजागी खड्डेच खड्डे असल्याने, वाहनधारकांना वाट शोधणे अवघड होताना दिसले. त्यामुळे प्रशासनाने हे खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली. त्याकरिता खड्ड्यांमध्ये पेव्हरब्लॉक बसविण्याची अभिनव कल्पना प्रशासनाने राबविली. परंतु, ही कल्पना आता पूर्णपणे फोल ठरलेली दिसत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून शहरात पावसाच्या सरी बरसत असल्याने, पेव्हर ब्लॉक बसविलेल्या खड्ड्यांच्या चहुबाजूने आणखी खड्डे निर्माण झाले आहेत. काही भागांमधील पेव्हरब्लॉक उखडले आहेत, तर काही भागांतील पेव्हरब्लॉकचा फुगवटा झाल्याने, वाहनधारकांची कसरत अधिकच वाढली आहे.

खड्ड्यांमध्ये बसविलेल्या पेव्हरब्लॉकमध्ये पाणी साचत असल्याने, हे पाणी जागीच मुरत आहे. त्यामुळे पेव्हरब्लॉकच्या आजुबाजूचा रस्ता भुसभुशीत होऊन त्या ठिकाणी पुन्हा एकदा खड्डे होत आहेत. त्यामुळे प्रशासनाची ही पेव्हरब्लॉकची आयडिया फोल ठरत असून, खड्डे बुजविण्यासाठी तात्पुरता नव्हे, तर कायमस्वरूपी उपाय शोधावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, प्रशासन अजूनही पेव्हरब्लॉक बसविण्यावरच भर देत असल्याने, खड्डे बुजविण्यासाठी तात्पुरत्या प्रयोगाचा एवढा अट्टहास का? असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

पेव्हरब्लॉक उखडले

प्रशासनाने खड्डे बुजविण्यासाठी बसविलेले पेव्हरब्लॉक बहुतांश भागात उघडले आहेत, तर काही भागांत खड्ड्यांमध्ये नुसतेच पेव्हर ब्लॉक ठेवून दिल्याने, ते अपघातास कारण ठरत आहेत. या धोकादायक पेव्हरब्लॉकवरून वाहने नेल्यास, वाहने घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे खड्ड्यांमध्ये नुसतेच पेव्हरब्लॉक ठेवून प्रशासनच नागरिकांचा जीव धोक्यात घालतेय काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नाशिक :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news