कल्याणच्या लेडिज सर्व्हिस बारमध्ये राडा; मालकाने घातला ग्राहकाच्या डोक्यात दगड | पुढारी

कल्याणच्या लेडिज सर्व्हिस बारमध्ये राडा; मालकाने घातला ग्राहकाच्या डोक्यात दगड

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : ऑर्केस्ट्रा बारच्या नावाने अश्लील आणि विभत्स नृत्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या लेडीज सर्व्हिस बारमध्ये पुन्हा एकदा हॉटेल चालकाने ग्राहकाला बेदम मारहाण करून डोक्यात दगड टाकून गंभीर जखमी केले. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी हॉटेल चालकासह त्याच्या साथीदारावर विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. तथापि अद्याप या प्रकरणी कुणालाही अटक करण्यात आली नाही. अभिषेक असे गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोर हॉटेल चालकाचे नाव असून निशू पांडे त्याच्या साथीदाराचे नाव आहे, तर रंजित झा (27) असे गंभीर जखमी झालेल्या ग्राहकाचे नाव आहे.

कल्याण पूर्वेकडील मलंग गड रोडला असलेल्या नांदिवली गावाच्या हद्दीत कशिश या नावाने ऑर्केस्ट्रा बार आहे. या बारमध्ये बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास रंजित हा आपल्या दोन मित्रांसोबत पार्टीसाठी गेला होता. त्यावेळी त्याचे दोन मित्र एका टेबलवर बसले होते. त्यानंतर काही वेळाने रंजित बारमध्ये येऊन टेबलवर बसताच हॉटेलचालक अभिषेक याने रंजितला बारमध्ये बसण्यास मनाई केली. हॉटेलचालक अभिषेक इथेच थांबला नाहीतर त्याने शिवीगाळ करून लाथा-बुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे बारमधील इतर ग्राहकांमध्ये एकच गोंधळ उडाल्याचे पाहून हॉटेलचालक अभिषेकने रंजितला बार बाहेर खेचून आणले. त्याला बारबाहेर पुन्हा दोघांनाही बेदम मारहाण केली. याच दरम्यान अभिषेक याने रस्त्यावरील दगड उचलून रंजितच्या डोक्यात टाकला. या हल्ल्यात डोक्यासह डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.दरम्यान, कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जखमी रंजित याने दिलेल्या तक्रारीवरून अभिषेक व त्याचा साथीदार निशू पांडेविरोधात गुन्हा दाखल केला असून, या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार काळे करत आहेत.

Back to top button