

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा
देवळा-कळवण रोडवरील भऊर फाट्याजवळ सोमवारी (दि. 27) दुपारी चारच्या सुमारास दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात होऊन उमराणे (ता. देवळा) येथील निवृत्त वनपालासह एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली. याबाबत देवळा पोलिस ठाण्यात सायंकाळी उशिरा अपघाताची नोंद करण्यात आली. निवृत्त वनपाल नानासाहेब कारभारी देवरे (59) हे आपल्या दुचाकीने कळवणकडून देवळ्याच्या दिशेने येत असताना, देवळ्याकडून शिऊर बंगला (ता. वैजापूर) येथील सागर सनुर विके (47) हे दुचाकीने (एमएच 20 जीए 6072) कळवणकडे जात होते. यावेळी खड्डे टाळण्याच्या प्रयत्नात दोन्ही दुचाकींचा समोरासमोर अपघात झाला.
त्यात डोक्याला मार लागल्याने व अतिरक्तस्राव होऊन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. देवरे हे सध्या चांदवड येथील डावखरनगर येथे वास्तव्यास होते. देवळा तालुका भारतीय जनता पक्षाचे तालुका सरचिटणीस दिशांत देवरे यांचे ते वडील होत. देवळा- कळवण रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून, सप्तशृंगगडावर जाणार्या या रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. त्यामुळे नेहमीच अपघात होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण यांनी केली आहे.