पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दोन फुटांनी वाढ | पुढारी

पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दोन फुटांनी वाढ

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. सोमवारी पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दोन फुटांनी वाढ झाली. धरणांतील पाणीसाठ्यातही संथ वाढ सुरू आहे. दिवसभराच्या उघडिपीनंतर सायंकाळी पुन्हा पाऊस सुरू झाला.

सोमवारी सकाळी काही काळ पाऊस झाला. यानंतर शहर आणि परिसरात पावसाने पूर्ण उघडीप दिली. काही काळ ऊनही पडले. जिल्ह्यात विशेषत: धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस सुरूच आहे. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या 24 तासात आजही कुंभी (77 मि.मी.), कासारी (99 मि.मी.), पाटगाव (111 मि.मी.), घटप्रभा (70 मि.मी.) आणि कोदे (109 मि.मी.) या पाच धरणांच्या परिसरात अतिवृष्टी झाली. राधानगरी परिसरात 53 मि.मी., तुळशी परिसरात 42 मि.मी.तर दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 49 मि.मी. पावसाची नोंद झाली.

पावसाने धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. यामुळे काही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. राधानगरी धरणातून आजपासून वीज निर्मितीसाठी 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. तुळशीतून 100 क्युसेक, वारणेतून 527 क्युसेक तर दूधगंगेतून 50 क्युसेक पाण्याचा सिंचन विसर्ग सुरू केला आहे. पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत संथ वाढ सुरू झाली आहे. पंचगंगेची पाणी पातळी आज दोन फुटांनी वाढली. रविवारी सकाळी 8.5 फुटांवर असलेली पाणी पातळी आज सकाळी 10.5 फुटांवर गेली.

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 11.5 मि.मी. पावसाची नोंद झाली. गगनबावड्यात सर्वाधिक 43.1 मि.मी. पावसाची नोंद झाली. भुदरगडमध्ये 40.5 मि.मी. पाऊस झाला. राधानगरीत 17.9 मि.मी.तर शाहूवाडीत 16.6 मि.मी. पाऊस झाला. चंदगडमध्ये 17 मि.मी. तर आजर्‍यात 12.4 मि.मी. पावसाची नोंद झाली. अन्य तालुक्यांतही पावसाची नोंद झाली.

Back to top button