भारतीय भूमीवर होणार युक्रेन-रशिया ‘युद्ध’ | पुढारी

भारतीय भूमीवर होणार युक्रेन-रशिया ‘युद्ध’

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था ‘भारतीय भूमीवर होणार युक्रेन-रशिया युद्ध’ हे शीर्षक वाचून धक्‍का बसला असेल तर थोडे सावरा; कारण बातमी खरी असली तरी हे युद्ध आहे, बुद्धिबळाचे. खर्‍याखुर्‍या युद्धामुळे रशिया-युक्रेन देशांमध्ये कोणत्याच स्पर्धेचे आयोजन होऊ शकत नाही. याचा फायदा घेत भारताने जुलै-ऑगस्ट महिन्यात होणार्‍या 44 व्या चेस ऑलिम्पियाडचे यजमानपद मिळवले आहे.

या स्पर्धेत युक्रेन, रशिया यांच्यासह 187 देशांचा सहभाग असून, फिफा वर्ल्डकप, ऑलिम्पिक आणि वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपनंतर सर्वात मोठी स्पर्धा म्हणून चेस ऑलिम्पियाडचे नाव आहे. ही स्पर्धा आधी मॉस्कोमध्ये होणार होती; परंतु रशियात असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे स्पर्धा तेथून हलवण्यात आली आणि आता ती तामिळनाडूतील महाबलीपूरम या छोट्या शहरात होणार आहे.

28 जुलै ते 9 ऑगस्ट 2022 या काळात हे ऑलिम्पियाड होणार आहे. यामध्ये ओपन आणि महिला गटात 187 देशांतील 343 संघ सहभागी झाले आहेत. 28 जुलैला सायंकाळी उद्घाटन सोहळा रंगणार आहे. 29 जलैपासून स्पर्धेच्या फेर्‍यांना सुरुवात होणार आहे. 9 ऑगस्ट रोजी अकरावी फेरी आणि सांगता समारंभ होणार आहे. एकूण 14 दिवस ही स्पर्धा चालेल. या स्पर्धेची मशाल संपूर्ण भारतभर फिरून स्पर्धास्थळी येणार आहे.

जुलै महिन्यात तामिळनाडूत चेस ऑलिम्पियाडचे आयोजन

युक्रेन-रशिया आमने-सामने

ऑलिम्पियाडदरम्यान आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटना अर्थात ‘फिडे’ अध्यक्षांची निवडही होणार आहे. ‘फिडे’चे विद्यमान अध्यक्ष आणि रशियाचे माजी उपपंतप्रधान आर.के.डी. वोरकोव्हिच हे दुसर्‍यांदा या पदावर दावा सांगत आहेत. तर त्यांना युक्रेनचे ग्रँडमास्टर अँड्री बॅरीशपोलेटस् यांनी आव्हान दिले आहे. बुद्धिबळ संघटनेचा राजा कोण? यासाठी महाबलीपूरमच्या भूमीवर निवडणुकीची रणधुमाळी होईल. विशेष म्हणजे, वोरकोव्हिच यांनी आपल्या पॅनेलमधून उपाध्यक्षपदासाठी भारताचे विश्‍वनाथन आनंद यांचे नाव पुढे आणले आहे. तर विरोधी गटातून कार्लसन यांचा कोच पीटर हेन नीलसन हे आनंदला टक्‍कर देणार आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर या निवडणुकीला महत्त्व प्राप्‍त झाले आहे.

हेही वाचा

Back to top button