नाशिक : पुढारी रुतसेवा
डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमी येथे शनिवारी (दि.11) झालेल्या पासिंग आउट परेडच्या नेत्रदीपक सोहळ्यात नाशिक जिल्ह्यातील तिघे तरुण अधिकारी बनून लेफ्टनंट या पदावर लष्करात दाखल झाले. तत्पूर्वी या तरुणांनी नॅशनल डिफेन्स अकॅडमी येथे तीन वर्षांचे, तर इंडियन मिलिटरी अकॅडमी येथील एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. यानिमित्ताने नाशिकने पुन्हा एकाचवेळी देशाला तीन लष्करी अधिकारी दिले आहेत.
या अधिकार्यांमध्ये चांदवडचा लेफ्टनंट ओम नितीन गांगुर्डे, नाशिकचा लेफ्टनंट वेदांत प्रशांत घंगाळे आणि सिन्नरचा लेफ्टनंट अनिकेत मुकेश चव्हाणके यांचा समावेश आहे. ले. ओम गांगुर्डे हा चांदवडजवळील काजीसांगवीचा रहिवासी असून, त्याचे वडील नितीन गांगुर्डे आणि आई सुमन गांगुर्डे हे दोघेही डॉक्टर आहेत. वडील डॉ. नितीन गांगुर्डे हे चांदवड पंचायत समितीचे माजी सभापती आहेत. ओम याचे शालेय शिक्षण चांदवडच्या एसएनजेबी शाळेत, तर अकरावी आणि बारावीचे शिक्षण औरंगाबाद येथे महाराष्ट्र शासनाच्या एसपीआय या संस्थेमध्ये झाले. अधिकारी बनून ओम हे भारतीय लष्कराच्या तोफखाना विभागात दाखल होत आहेत.
ले. वेदांत प्रशांत घंगाळे हा नाशिकच्या गोविंदनगरचा रहिवासी असून, त्याचे शालेय शिक्षण अशोका शाळेत, तर महाविद्यालयीन शिक्षण केटीएचएम महाविद्यालयात झाले. त्याने अकरावी आणि बारावीच्या अभ्यासासोबतच नाशिकमध्येच सुदर्शन अकॅडमीत एनडीएची तयारी केली आणि पहिल्याच प्रयत्नात त्याची एनडीएसाठी निवड झाली. अधिकारी झाल्यानंतर त्याची नियुक्ती आता गोरखा रायफल्समध्ये झाली आहे. त्याचे वडील प्रशांत घंगाळे हे व्यावसायिक तथा आर्थिक गुंतवणूक सल्लागार असून, आई वर्षा या गृहिणी आहेत.
ले. अनिकेत चव्हाणके हा सिन्नरचा रहिवासी असून, त्याचे शालेय शिक्षण रायन शाळेत, तर महाविद्यालयीन
शिक्षण एसपीआय औरंगाबाद या संस्थेत झाले. त्याचे वडील मुकेश चव्हाणके हे निवृत्त बँक कर्मचारी असून, आई लता या गृहिणी आहेत. अनिकेत याचे थोरले बंधू कुणाल हे अभियंता असून, सध्या मुंबईत पेटीएम या कंपनीत टेक्निकल लीडर या पदावर कार्यरत आहेत. ले. अनिकेत याची नियुक्ती जम्मू-काश्मीर लाइट इन्फन्ट्रीमध्ये झाली आहे.
ओम, अनिकेत आणि वेदांत हे तिघेही सुदर्शन अकॅडमीचे विद्यार्थी आहेत. 2016 मध्ये ओम आणि अनिकेतने एसपीआयसाठी निवड झाल्यानंतर तेथूनच एनडीएची तयारी केली, तर वेदांतने नाशिकमधूनच तयारी केली. सर्व नाशिककरांप्रमाणेच या मुलांचा शिक्षक असल्याने आम्हा सर्वांनाही या तरुणांचा अभिमान आहे. नाशिकच्या विद्यार्थ्यांची ही भरारी येत्या काळात जिल्ह्यातील तरुण-तरुणींना प्रोत्साहन देत राहील.
– हर्षल आहेरराव, सुदर्शन अकॅडमी, नाशिक