नाशिक : जास्त पावसामुळे तुंबले पाणी ; मनपा शहर अभियंत्याचा दावा, म्हणे 27 नव्हे, 75 मिमी पाऊस

नाशिक : जास्त पावसामुळे तुंबले पाणी ; मनपा शहर अभियंत्याचा दावा, म्हणे 27 नव्हे, 75 मिमी पाऊस
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहर, परिसरात बर्‍याच ठिकाणी पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनधारकांसह पादचार्‍यांना वाहतूक कोंडी आणि अपघातांना सामोरे जावे लागते. त्यामुळे तुंबलेले चेंबर्स आणि ढापे उघडून साचलेल्या पाण्याचा निचरा मनपाकडून केला जातो. मात्र, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढला जात नाही. त्याउलट पावसाचे प्रमाण पावसाळी गटार योजनेच्या क्षमतेशी जोडून मनपाकडून हे प्रकरण दरवेळी मारून नेले जात असल्याचा अनुभव येत असतो.

गुरुवारी (दि. 4) सायंकाळी शहर, परिसरात अवघा एक तास मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि या एक तासाच्या पावसामुळे नाशिकमधील अनेक ठिकाणांना पुराचे स्वरूप आले. गडकरी चौक, पिनॅकल मॉल, सारडा सर्कल, मायको सर्कल, रामायण निवासस्थान, पोलिस आयुक्तालय रोड, चिंचबन यासह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबले. त्यामुळे सर्वच रस्त्यांवर वाहतूक कोंडी झालेली दिसली. पाणी तुंबल्याने त्याची दखल मनपाच्या ड्रेनेज विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घेण्यात आली. त्या-त्या ठिकाणच्या प्लास्टिक, गवत आणि इतर कचर्‍यामुळे तुंबलेले चेंबर आणि ढाप्यांची सफाई करण्यात येऊन साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यात आला. पश्चिम विभागातील सराफ बाजार, मायको सर्कल, कॉलेज रोड येथे पाणी साचले होते. तसेच एमआयडीसीतील महिंद्रा टूल, प्रभाग 9 मनपा शाळा क्र 21 कडे जाणारा रस्ता आणि प्रभाग 10 मधील सुला चौकातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. त्याशिवाय सातपूर प्रभाग क्रमांक 9 मध्ये पार्थ हॉटेलमागील जाळी, शिवाजीनगर बसस्टॉप तसेच शहरातील प्रभाग क्रमांक 6 आसाराम बापू रोड, रासबिहारी रोड, मखमलाबाद रोड, हनुमानवाडी जलकुंभाजवळही पाण्याचा निचरा करण्यात आला.
पाणी तुंबण्यावर मनपाकडून पडदा

शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांना पाणी तुंबण्याबाबत विचारले असता, त्यांनी पावसाळी गटार योजनेद्वारे प्रतितास 27 मिमी इतके प्रमाण असणार्‍या पावसाचे पाणी वाहून नेण्याची क्षमता असून, गुरुवारी पडलेला पाऊस 75 मिमी इतका असल्यानेच पाणी तुंबल्याचा दावा केला आहे. वास्तविक गुरुवारी 27 मिमी इतक्याच पावसाची नोंद झालेली आहे. असे असताना बांधकाम विभागाकडून मात्र 75 मिमी पावसाचा दावा करून पाणी तुंबण्याच्या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेच निष्पन्न होते.

रस्ता खाली, चेंबर वरच्या बाजूला
शहरात अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने चेंबर आणि ढाप्यांची रचना करण्यात आलेली आहे. पावसाचे पाणी तत्काळ वाहून जाण्यासाठी चेंबर आणि ढापे हे रस्त्याच्या समांतर असणे गरजेचे असते. मात्र, बर्‍याच ठिकाणी रस्ता खाली, तर चेंबर आणि ढापे वर अशी अवस्था असल्याने पाण्याचा निचराच होत नाही. तसेच पावसाळापूर्व कामे करतानाच नाले, चेंबर आणि ढाप्यांमध्ये अडकून पडलेल्या कचर्‍याची स्वच्छता करणे आवश्यक असताना या कामांना विलंब झाल्याने ती पूर्ण क्षमतेने होऊ शकलेली नाहीत.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news