डोक्यावर पुन्हा केस उगवू शकणार्‍या प्रोटिनचा शोध | पुढारी

डोक्यावर पुन्हा केस उगवू शकणार्‍या प्रोटिनचा शोध

न्यूयॉर्क : विचित्र जीवनशैली, खाण्या-पिण्यात पोषक घटकांची कमतरता, थायरॉईडसारख्या काही समस्या तसेच अधिक तणाव किंवा काही अनुवंशिक कारके यामुळे अनेक लोकांना कमी वयातच टक्कलग्रस्त होण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. अशावेळी अनेकांचा आत्मविश्वासही खचून जात असतो. आता भविष्यात ही समस्या दूर होऊ शकेल. अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी केसांच्या मुळातील एक प्रमुख रसायन असलेल्या प्रोटिनचा शोध लावला आहे. त्याच्या सहाय्याने डोक्यावर पुन्हा केस उगवणे शक्य होईल.

हे रसायन केवळ केस उगवण्यासाठीच नव्हे तर कोणत्याही प्रकारची जखम लवकर भरून यावी यासाठीही उपयुक्त आहे. हे संशोधन स्टेम सेल्स म्हणजेच मूळ पेशींवर आधारित आहे. या शरीरातील अशा पेशी असतात ज्यांचे रूपांतर शरीरातील अन्य कोणत्याही पेशींमध्ये करता येऊ शकते. टक्कल पडण्याची समस्या दूर करण्यासाठीही संशोधकांनी या स्टेम सेल्सचाच वापर केला आहे.

संशोधक किक्सुआन वांग यांनी सांगितले की जर आपली जखम लवकर बरी होत असेल तर त्याचा अर्थ आपल्या शरीरातील स्टेम सेल्स असे करण्यासाठी मदत करीत आहेत. विज्ञानात असाच अर्थ घेतला जात असतो. ते लक्षात ठेवून आम्ही ‘टीजीएफ-बीटा’चा शोध लावला. हे एक प्रकारचे प्रोटिन आहे. ते केसांच्या मूळामध्ये पेशींचे विभाजन व विकासाची प्रक्रिया वेगवान होण्यासाठी तसेच नव्या पेशींच्या निर्मितीसाठी मदत करते. त्याचा उपयोग टक्कल पडण्याची समस्या दूर करण्यासाठी होऊ शकेल.

Back to top button