नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पोलिस दलातील कर्मचार्यांना आंतरजिल्हा बदल्यांसाठी 'सफरिंग सर्टिफिकेट' म्हणजेच घरातील कोणी व्यक्ती आजारी असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागत असते. मात्र, यासाठी काही पोलिसांनी जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना हाताशी धरून पैसे देऊन बनावट प्रमाणपत्र तयार केले. त्यानंतर बनावट प्रमाणपत्र पोलिस प्रशासनाकडे सादर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे राज्यभर बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे आंतरजिल्हा बदल्या होत असल्याचे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय वर्तवला जात आहे.
ऑगस्ट महिन्यात या प्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, ग्रामीण पोलिस मुख्यालयातील वरिष्ठ लिपिकासह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर पोलिसांनी तपास करून वरिष्ठ लिपिक हिरा रवींद्र कनोज यांना सात सप्टेंबरला अटक केली होती. त्यांना 12 सप्टेंबरला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर सोमवारी (दि.12) जिल्हा रुग्णालयातील लिफ्टमन कांतीलाल रामभाऊ गांगुर्डे (रा. गोवर्धन) यांना तालुका पोलिसांनी अटक केली आहे. गांगुर्डे यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वरिष्ठ लिपिक कनोज यांच्याकडे आंतरजिल्हा बदल्यांची जबाबदारी सोपवली होती. त्यानुसार बदलीसाठी पोलिसांनी त्यांचे नातलग आजारी असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सोबत जोडले होते. मात्र, हे प्रमाणपत्र काळजीपूर्वक न पाहता कनोज यांनी अर्जांमध्ये खाडाखोड केली व वरिष्ठांकडे सादर केली. त्यामुळे या प्रमाणपत्रांची पुन्हा पडताळणी केली असता नाशिक व धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयांमधील वैद्यकीय अधिकार्यांनी संगनमत करून नातलगांना कोणताही आजार नसतानादेखील प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करून बनावट प्रमाणपत्र तयार करून दिले. त्यामुळे वरिष्ठ लिपिक, रुग्णालयांमधील वैद्यकीय अधिकारी, खासगी डॉक्टर व रुग्णालयांमधील कर्मचार्यांनी संगनमत करून शासनाची फसवणूक केल्याचे टेंभेकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी सुरुवातीस कनोज यांना अटक केली व त्यांना पाच दिवस पोलिस कोठडी देत चौकशी केली. प्रशासनाने त्यांना निलंबित केले आहे. तर सोमवारी जिल्हा रुग्णालयातील लिफ्टमन गांगुर्डे यांना अटक केली आहे. त्यांनाही न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
ग्रामीण पोलिसांनी मे-जून मध्ये जिल्हा रुग्णालयाकडे वैद्यकीय प्रमाणपत्रांबाबत नोटीस बजावली होती. त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी प्रमाणपत्रांवर स्वाक्षरी करणार्या डॉक्टरांकडे अहवाल मागितला होता. तो अहवाल त्यांनी ग्रामीण पोलिसांना सुपूर्द केला होता. मात्र, वैद्यकीय अधिकार्यांचे अहवाल समाधानकारक नसल्याचे बोलले जात आहे.
शासन निर्णयानुसार आंतरजिल्हा बदलीसाठी अनेक अटी आहेत. त्यापैकी शस्त्रक्रियेची एक अट आहे. अर्जांच्या छाननीत काही अर्जदारांनी बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यातील घोळ उघड झाला आहे.
– सचिन पाटील, पोलिस अधीक्षक
यांच्याविरोधात दाखल आहे गुन्हा
पोलिस मुख्यालयातील वरिष्ठ लिपिक हिरा कनोज, प्रमाणपत्रांवर स्वाक्षरी करणारे नाशिक व धुळे जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, नाशिक जिल्हा रुग्णालयातील लिफ्टमन कांतीलाल गांगुर्डे, जिल्हा रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक किशोर मुरलीधर पगारे, सातपूरमधील अशोकनगर येथील प्रभावती रुग्णालयातील डॉ. स्वप्नील सैंदाणे, सिडकोतील सहजीवन रुग्णालयातील डॉ. विरेंद्र यादव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.