पुणे; पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियेचा निकाल जाहीर करण्यात आला. या भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले होते. मात्र, आता निकाल आणि निवड जाहीर झाल्याने उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
म्हाडा सरळसेवा भरती 2021 अंतर्गत 14 तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील 565 पदांसाठीची भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आली. त्यानुसार जानेवारी आणि फेब—ुवारीमध्ये परीक्षा घेण्यात आली. मात्र, या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करीत एमपीएससी समन्वय समितीने पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी केलेल्या तपासात गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले.
त्यामुळे पुनर्परीक्षा घेण्याची वेळ म्हाडावर आली. झालेल्या गैरप्रकाराबाबतची पोलिस कार्यवाही सुरू आहे. मात्र, परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार, याची उमेदवारांना प्रतीक्षा होती. या पार्श्वभूमीवर निकाल जाहीर करण्यात आला. निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जात वैधता प्रमाणपत्र, उमेदवारांनी समांतर आरक्षणाअंतर्गत सादर केलेली प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्र आणि शैक्षणिक प्रमाणपत्र पडताळणीच्या अधीन राहून जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ही यादी तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचेही नमूद करण्यात आले.