धुळे : (पिंपळनेर) : पुढारी वृत्तसेवा
पिंपळनेर सटाणा रोडवर शेलबारी घाटातील सरकार हॉटेलच्या पुढे कत्तलीच्या उद्देशाने गाय व गुरे घेऊन जाणारे वाहन पोलिसांनी पकडले. पिंपळनेर पोलिसांनी केलेल्या या कारवाईत 9 गायींची सुटका करण्यात आली.
साक्री तालुक्यातील पिंपळनेर पोलीस स्टेशन अंतर्गत सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. प्राप्त माहितीनुसार सापळा रचून एक पथक तयार करण्यात आले. संशयित वाहनाचा शोध घेतला असता त्या (पिकअप क्रमांक एम एच ०४ डी.एस ९३९१) वाहनातून गुरांची वाहतूक होत असल्याचे दिसले. या वाहनाचा पाठलाग करुन ते ताब्यात घेण्यात आले. भूषण ज्ञानेश्वर वाघ यांच्या फिर्यादीवरून चालक शोएब अहमद शकील (वय २७) रा. पवार वाडी फिरोजाबाद गल्ली, मालेगाव व वाहक अब्दुल अहमद खान (वय २०), मालेगाव या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पिंपळनेर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे, पोलीस नाईक सी.एस. सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.