

जळगाव : पुढारी वृत्तसेवा; जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणच्या पाणलोट क्षेत्रात काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे. यामुळे गुरुवारी (दि.७) धरणाचे ३० दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले आहेत, त्यामुळे तापी नदीपात्रात ३९ हजार २०० क्युसेकने पाणी सोडले जात आहे. त्यामुळे तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या वरुणराजाने मर्जी दाखवीत, शेती पिकासाठी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या जळगाव जिल्ह्यात आगमन केले. सध्या जिल्हाभरात चांगला पाऊस असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून हतनूर धरण पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे धरणाच्या साठ्यात भरीव वाढ झाल्याने जिल्हात दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. तर पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाच्या चेहऱ्यावरही हास्याची लकेर उमटली आहे.
हतनूर धरणातून भुसावळ तालुक्यासह रेल्वे, वरणगाव आयुध निर्माणी, दीपनगर औष्णिक केंद्रांसह जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, धरणगाव, यावल, सावदा मोठ्या पालिका व बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर एमआयडीसी तसेच तब्बल १३० गावांना पाणीपुरवठा केला जातो. सध्या धरणाची पातळी २०९.५२० मीटर आहे. त्यामुळे ४६.४९ टक्के साठा उपलब्ध झाला आहे. धरणात पाण्याची आवक वाढत असून, ३९ हजार २०० क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे.