राजगुरुनगर : जैदवाडीत पोलिसांनी बालविवाह रोखला | पुढारी

राजगुरुनगर : जैदवाडीत पोलिसांनी बालविवाह रोखला

राजगुरुनगर : खेड पोलिसाच्या सतर्कतेमुळे जैदवाडी (ता. खेड) येथे होत असलेला बालविवाह रोखण्यात आला. मुलगा-मुलगी अल्पवयीन असल्याने दोन्ही पालकांचे समुपदेशन पोलिस व बालकल्याण अधिकाऱ्यांनी केले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जैदवाडी येथील ठाकरवाडीत ३ जुलै रोजी एका अल्पवयीन मुलीचा व मुलाचा बालविवाह होणार असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, पोलिस निरिक्षक सतीश गुरव यांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे महिला पोलिस उपनिरीक्षक वर्षाराणी घाटे यांनी माहिती बाल संरक्षण अधिकारी नुतन देवकर, बाल कल्याण पर्यवेक्षक चंद्रभागा खामकर यांना कळविले. त्यांनी पोलिसाच्या मदतीने मध्यरात्री विवाह सोहळा होणार होता, त्या ठिकाणी धाव घेत अल्पवयीन मुलीच्या आणि मुलाच्या पालकांची भेट घेतली. त्यांचे समुपदेशन केले. तसेच बालविवाह कायद्याने गुन्हा आहे, हे त्यांना समजावून सांगितले. बालविवाह केल्यानंतर बालविवाह प्रतिबंध कायद्याप्रमाणे आपणास दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि ५० हजारांपर्यंत दंड होऊ शकतो, या कायदेशीर बाबी त्यांना समजावून सांगितल्या.

या प्रकरणी बाल संरक्षण अधिकारी नुतन देवकर, बाल कल्याण पर्यवेक्षक चंद्रभागा खामकर यांनीही हस्तक्षेप करून मार्गदर्शन केले. महिला पोलिस उपनिरिक्षक वर्षा राणी घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रविंद्र कारंडे, सचिन गिलबिले, पोलिस नाईक प्रविण ,गेंगजे स्वप्नील लोहार यांनी या बालकांचा विवाह हा बालकांचे लग्नाचे वय पूर्ण झाल्यानंतर करणार आहे, असे हमीपत्र लिहून घेतले. तसेच तालुक्यात कोठेही बालविवाह होत असेल तर पंचायत समिती खेड बाल संरक्षण अधिकारी नुतन देवकर यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button