नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिवसेना नेते तथा राज्याचे नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडाचा झेंडा उगारल्याच्या घटनेचे पडसाद नाशिक शहरातही उमटले. नाशिकमध्ये शालिमार येथील मध्यवर्ती कार्यालयासमोर शिवसैनिकांनी एकत्र येऊन जोरदार शक्तिप्रदर्शन करीत घोषणाबाजी केली.
ना. शिंदे यांनी विधान परिषद निवडणुकीनंतर काही समर्थक आमदारांसह गुजरात गाठल्याने महाविकास आघाडीच्या सत्तेला सुरूंग लागला आहे. शिंदे यांच्यामुळे राजकीय भूकंप निर्माण झाला असून, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तेचा घरोबा करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. ना. शिंदे यांनी घेतलेल्या पवित्र्यानंतर मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी शिंदे यांच्या विरोधात, तर उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी शिवसैनिकांनी निदर्शने करीत शक्तिप्रदर्शन केले.
मंगळवारी (दि. 21) नाशिकला शिवसेनेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोर एकत्र येऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत असल्याचे दर्शविले. या प्रसंगी शिवसेनेचे उपनेते सुनील बागूल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, मनपातील माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, शिवसेनेचे माजी गटनेते विलास शिंदे, वैभव ठाकरे, सचिन बांडे, राजेंद्र वाकसरे आदी उपस्थित होते.