सातारा : जनतेचा कौल न मानल्यानेच शिवसेनेत बंडाळी : आमदार जयकुमार गोरे | पुढारी

सातारा : जनतेचा कौल न मानल्यानेच शिवसेनेत बंडाळी : आमदार जयकुमार गोरे

वाई : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्राच्या राजकारणात काही वर्षांपूर्वी वसंतदादाच्या पाठीत खंजीर खुपसून सत्ता स्थापन केल्याचा इतिहास असणार्‍यांच्या बरोबर जावून शिवसेनेने राष्ट्रवादी व काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. जनतेने दिलेला कौल त्यांनी मान्य न केल्याने शिवसेनेत सध्या प्रचंड बंडाळी झाली, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष व आमदार जयकुमार गोरे यांनी केली.

वाईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजपचे सातारा जिल्हा प्रभारी अतुल भोसले, माजी आमदार मदनदादा भोसले, माजी जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, जिल्हा संघटक वडणे, प्रतापगड उत्सव समितीच्या निमंत्रक विजयाताई भोसले, वाई अर्बन बँकेचे अध्यक्ष सी.व्ही काळे, सचिन घाटगे, यशवंत लेले, रोहिदास पिसाळ, अनिरुध्द गाढवे, मधुकर बिरामणे, डॉ. सुरभी भोसले, यशराज भोसले, अमर कोल्हापूरे, प्रवीण जगताप, सतीश भोसले, तेजस जमदाडे उपस्थित होते.

आ. जयकुमार गोरे म्हणाले, आघाडीमध्ये असंतोष एवढा आहे की विधान परिषदेच्या आमच्या पाच ऐवजी सहा जागा असत्या तरी निवडून आल्या असत्या. थोड्याच दिवसांत महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. जनतेला अपेक्षित शासन राज्यात येण्याची शक्यता आहे.

अतुल भोसले म्हणाले, केंद्र शासनाच्या जणकल्याणकारी योजना घरोघरी पोहोचवा. तळागाळातील संघटन मजबूत करावे लागेल तरच पक्ष मजबूत होईल. गेल्या आठ वर्षात मोदी सरकारच्या माध्यमातून अनेक जनहिताच्या योजना राबवण्यात आल्या. देशासह राज्यामध्ये सुध्दा भाजप सत्तेत आल्यास विकासकामांना गती मिळेल. सूत्रसंचालन मनिषा घैसास यांनी केले. तर आभार यशवंत लेले यांनी मानले. यावेळी वाई तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

आषाढीची पूजा फडणवीस करतील : आ. गोरे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा देवेंद्र फडणवीसच होतील तसेच यावर्षीची पंढरपूर येथील आषाढी एकादशीची शासकीय पुजाही तेच करतील, असा दावा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी सातारा येथे पत्रकारांशी बोलताना केला. सातार्‍यात मंगळवारी भाजपाच्या सातारा, जावली व कोरेगाव येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आ. गोरे यांनी लवकरच राज्यात भाजपचे सरकार येणार असल्याचे संकेत दिले. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर झालंय का नाही? या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना आ. जयकुमार गोरे म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री होतील. त्याबाबतची बातमीही आपल्याला लवकरच येईल. यंदाची पंढरपूर येथील आषाढी एकादशीची शासकीय पूजाही देवेंद्र फडणवीस हेच करतील.

Back to top button