नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (दि.६) देशातील ५०८ रेल्वे स्थानकांचा अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत पुर्नविकास करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील मनमाड, नगरसुल, नांदगाव व लासलगाव या चार स्थानकांचा यात आहे. जिल्ह्यावासीयांसाठी हा अभिमानाचा क्षण असला तरी जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचे स्थानक असलेल्या नाशिकरोडचा पुर्नविकास रखडल्याने नाशिककरां मध्ये नाराजीचा सुर आहे.
केंद्र सरकारच्या अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत देशातील ५०८ व नाशिक जिल्ह्यातील ४ रेल्वे स्थानकांचे कायापालट होणार आहे. मनमाड रेल्वेस्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी ४४.८० कोटी रूपये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नगरसूलसाठी २०.०३, लासलगावला १०.१० तसेच नांदगावसाठी १०.१४ कोटी निधी सरकारने मंजूर केला आहे. वर्षभरात या चारही स्थानकांचे रुपडे पालटणार आहे. मात्र, जिल्ह्यातील महत्वाचे व सर्वाधिक प्रवासी संख्या असलेल्या नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या नुतनीकरणाचे घोंगडे अजूनही भिजत पडले आहे.
भुसावळ विभागात नाशिकरोड स्थानकातून दररोज सुमारे ६० ते ७० प्रवासी व मालवाहू गाड्यांची ये-जा सुरू असते. दिवसभरात हजारो प्रवासी हे प्रवास करतात. त्याद्वारे महिन्याकाठी कोट्यावधींचे उत्पन्न रेल्वेला मिळते. त्यामुळे नाशिकरोडचे महत्व ओळखून सुमारे वर्षभरापूर्वी रेल्वे खात्याकडून या स्थानकाच्या नुतनीकरणाच्या चर्चेने वेग धरला होता. कोट्यावधींचा निधी देण्याची तयारी रेल्वेने दाखविली होती. पण, स्थानकाच्या नुतनीकरणाला अद्यापही मुहूर्त सापडलेला नसताना जिल्ह्यातील चार स्थानके अमृत भारत स्थानक योजनेतून कात टाकणार आहेत. त्यामुळे या चार स्थानकांसोबत नाशिकरोड रेल्वेस्थानक विकासाला गती मिळावी, अशी अपेक्षा नाशिककरांकडून व्यक्त होत आहे.
कुंभमेळ्यापूर्वी कामे व्हावे
नाशिकरोड रेल्वेस्थानका चार फलाट असले तरी सध्या तीन फलाटांचा सर्वाधिक वापर होत आहे. गेल्या सिंहस्थात ऊभारलेला फलाट क्रमांक चारवरून मोजक्या रेल्वेगाड्या सुटतात. त्यामुळे सदर फलाटाचा पुर्णपणे वापर केला जावा. तसेच २०२६ ला त्र्यंबकेश्वर-नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्या पूर्वी रेल्वे स्थानकाच्या नुतनीकरणाचे काम पूर्ण व्हावे, अशी मागणी जिल्हावासीयांमधून होत आहे.
रखडलेले प्रकल्प
-इगतपूरी-नाशिक-मनमाड तिसरी लाईन
-नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे थंड बस्त्यात
हेही वाचा :