use of brain : आपण मेंदूचा केवळ दहा टक्केच भाग वापरतो? | पुढारी

use of brain : आपण मेंदूचा केवळ दहा टक्केच भाग वापरतो?

वॉशिंग्टन : सन 1936 मध्ये अमेरिकन लेखक लॉवेल थॉमस यांनी डेल कॉर्नेजीच्या ‘हाऊ टू वीन फे्ंरडस् अँड इन्फ्लुएन्स पिपल’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत जे म्हटले ते नंतर अनेकांकडून म्हटले जाऊ लागले. त्यांनी नोंदवले होते की हार्वर्डमधील प्रा. विल्यम जेम्स नेहमी म्हणत की सहसा माणूस आपल्या मानसिक क्षमतेचा केवळ दहा टक्केच वापर करतो. अनेक लोकांनी नंतर म्हणण्यास सुरुवात केली की माणूस आपल्या मेंदूचा केवळ दहा टक्केच भाग वापरतो. हे खरे आहे काय?

प्रा. विल्यम जेम्स यांना ‘अमेरिकन मानसशास्त्रा’चा जनक असे म्हटले जाते. त्यांनी खरेच असे उद्गार काढले होते काय हे कळण्यास मार्ग नाही. मात्र, ते पूर्णपणे चुकीचे आहे! हार्वर्ड युनिव्हर्सिटीतील इवोल्युशनरी न्यूरो सायन्सचे सहायक प्राध्यापक एरिन हेच यांनी सांगितले की माणूस नेहमी आपल्या संपूर्ण मेंदूचा वापर करीत असतो. टेक्सास युनिव्हर्सिटीतील ‘द ब्रेनहेल्थ प्रोजेक्ट’च्या प्रमुख आणि ‘कॉग्निटिव्ह न्यूरो सायंटिस्ट असलेल्या ज्युली फॅ्रटांटोनी यांचेही असेच मत आहे.

माणूस आपल्या मेंदूचा केवळ दहा टक्के वापर करतो अशी दंतकथा ही खरोखरच मजेशीर आहे असे त्यांनी म्हटले आहे. त्या म्हणतात ‘केवळ दहा टक्केच वापर केल्याने काम कसे होईल? एनर्जी मेटाबॉलिजमचा दहा टक्के, इलेक्ट्रिकल अ‍ॅक्टिव्हिटीचा दहा टक्के, ब्लड ऑक्सिजनेशन लेव्हलचा दहा टक्के असे घडू शकते का? कधी कधी विद्यार्थी याबाबत मला विचारत असतात. त्यावर मी उत्तर देते की जर तुम्ही मेंदूचा केवळ दहा टक्केच भाग वापरत असाल तर तुम्ही कदाचित व्हेंटिलेटरवर असाल!’

Back to top button