आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकच्या तनिशा कोटेचाला दोन रजतपदके

Tanisha Kotecha,www.pudhari.news
Tanisha Kotecha,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जॉर्जिया येथे नुकत्याच पार पडलेल्या डब्ल्यूटीटी यूथ कन्टेंडर आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकच्या तनिशा कोटेचा हिने मुलींच्या 17 व 19 वर्षांखालील दोन्ही वयोगटांत अंतिम फेरीत धडक मारत रजतपदके पटकावली. या स्पर्धेत कझाकिस्तान, हाँगकाँग चायना, इराण, उझबेकिस्तान, अर्मेइना, अजरबैजान, जॉर्डन, जॉर्जिया, युक्रेन, बेल्जियम, यूएई, स्वीडन व ग्रीस या देशांतील टेबल टेनिसपटूंनी सहभाग घेतला होता. तनिशा ही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रजतपदक मिळविणारी पहिली टेबल टेनिसपटू ठरली आहे.

स्पर्धेच्या 17 वर्षांखालील मुलींच्या गटात तनिशाने उपांत्य फेरीत इराणच्या एक्ता आदिबियणचा 3-1 ने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत तिचा सामना हाँगकाँग चायनाची वांग हुई तुंग हिच्याबरोबर झाला. या सामन्यात तनिशाचा 3-1 असा पराभव झाल्याने तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. 19 वर्षांखालील मुलींच्या गटात उपांत्य फेरीत तनिशाने हाँगकाँग चायनाच्या ली हुई मन करेन हिचा 3-1 असा सहज पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात हाँगकाँग चायनाच्याच काँग तत्झ लाम हिच्याकडून तनिशाचा 3-2 असा पराभव झाल्याने उपविजेतेपदासह रजतपदक मिळाले.

दरम्यान, तनिशा ही प्रशिक्षक जय मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील तिच्या या यशाबद्दल जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, अर्जुन पुरस्कार विजेते कमलेश मेहता, शेखर भंडारी, राजेश भरवीरकर, अभिषेक छाजेड, जय मोडक आदींनी तिचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news