बावधन : तुटलेले छत अन् उंदीर, घुशींची भीती; शाळेत धोकादायक स्थितीत विद्यार्थ्यांचे शिक्षण | पुढारी

बावधन : तुटलेले छत अन् उंदीर, घुशींची भीती; शाळेत धोकादायक स्थितीत विद्यार्थ्यांचे शिक्षण

विनोद माझिरे
बावधन : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणार्‍या बावधन खुर्द येथील मनपा शाळेच्या इमारतीची सध्या दुरवस्था झाली आहे. फुटक्या, तुटक्या असलेल्या या इमारतीमध्ये परिसरातील मुले आपले भविष्य घडविण्यासाठी शिक्षण घेत आहेत. मात्र, महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. राम नदीकडेला असलेल्या या शाळेवरील सिमेंटचे पत्रे फुटल्याने पावसाचे पाणी अंगावर झेलत चिमुरडे सध्या शिक्षण घेत आहेत. एका बाजूला याच मुलांसाठी बांधलेली नवी इमारत वापराविना धूळ खात पडून आहे, तर दुसरीकडे जीर्ण झालेल्या धोकादायक इमारतील मुलांचे भवितव्य घडविले जात आहे.

या इमारतीच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तसेच वर्गाचे नवीन इमारतीत स्थलांतर देखील केले जात नाही. यामुळे आठशे मुलांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार मनपा प्रशासनाने चालविल्याचे पालकांचे म्हणणे आहे. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे या वर्गाचे छत्त तुटले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. सध्या पावसाचे दिवस असल्याने या वर्गांमध्ये व वर्‍हांड्यात पाणी साचत आहे. तुटकी, फुटकी फरशीही चिखलमातीने माखली आहे. याच फरशीवर बसून मुलांना जेवण करावे लागत आहे.

याच मुलांसाठी एलएमडी चौकात महापालिकेने सहा वर्षांपूर्वी नवीन इमारत बांधली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटनही झाले होते. तसेच शिक्षण मंडळाकडून त्या वेळी शंभर बेंचही या इमारतीत पुरविण्यात आले होते. परंतु, या इमारतीचताबा न मिळाल्याने मुलांना धोकादायक इमारतीत शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहे.

वर्गात साचलेले पावसाचे पाणी, भिजलेल्या फरशा, कुडकुडणारी मुले, अशा अवस्थेत जीव मुठीत धरून आम्हाला मुलांना शिकवावे लागत आहे.शाळा परिसरात उंदीर, घुशींचा उपद्रवही वाढला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ही अवस्था कायम आहे. मोडकळीस आलेल्या या धोकादायक इमारतीमुळे मुलांबरोबर आमचाही जीव टांगणीला लागत असल्याचे शाळेतील शिक्षकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

बावधन येथे नव्या इमारतीचे अंतर्गत काम राहिले आहे. याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर या शाळेचे नवीन इमारतीत स्थलांतर केले जाईल. पावसामुळे इमारतीच्या झालेल्या पडझडीची पाहणी मनपाच्या अधिकार्‍यांनी
केली आहे. त्यावर ते उपाययोजना करतील.
                               – सुरेश उचाळे, सहायक प्रशासकीय अधिकारी, कोथरूड

1 शाळेत मराठी माध्यमाचे सातवीपर्यंत सेमी इंग्रजीचे वर्ग भरतात.
2 या शाळेमध्ये प्रत्येकी 417 व 375 विद्यार्थी शिक्षण घेतात.
3 पुरेशा वर्गखोल्यांअभावी या शाळा दोन शिफ्टमध्ये भरतात.
4 इमारतीची अवस्था अतिशय जीर्ण झाल्याने ती धोकादायक.
5 वर्गाच्या भिंती आतून पोखरल्याने त्यातून वारंवार घुशी, विंचू निघतात.

Back to top button