नाशिक : पुढारी वृत्तसेवा
प्राचीन काळात स्त्रियांनी कृषीचा शोध लावला तसेच शेती व्यवसायाचे काम सर्वप्रथम महिलांनी केले, याचे दाखले इतिहासात आढळतात. मात्र, मधल्या काळात या पुरुषांचे वर्चस्व दिसून आले. आता पुन्हा एकदा परिस्थिती बदलली असून, पुरुषांबरोबर महिला शेतकरीदेखील मोठ्या प्रमाणात आधुनिकतेने शेती व्यवसाय करीत आहेत. केवळ महिला शेतकर्यांनी शेतमालावर प्रक्रिया उद्योग, मार्केटिंग व विक्री व्यवस्थापन या गोेष्टी समजून घेणे गरजेचे आहे, असे मत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले.
ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन व मीडिया एक्झिबिटर्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ठक्कर डोम येथे आयोजित कृषीथॉन प्रदर्शनात महिला शेतकरी पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. या सोहळ्यात महिला उद्योजक, महिला कृषी विस्तार कार्य, महिला प्रयोगशील संशोधक, महिला शेतकरी यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, आयोजक संजय न्याहारकर, साहील न्याहारकर, अश्विनी न्याहारकर, अंकिता न्याहारकर आदी उपस्थित होते. अंधारे म्हणाल्या की, कोणत्याही विषयावर प्रभुत्व मिळवायचे असेल, तर वाचन आवश्यक आहे. तसेच प्रत्येक समाजाची भाषा आपल्याला अवगत व्हायला हवी. सध्याच्या काळात शेतकर्यांचे प्रश्न बिकट आहेत. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या कोरडवाहू पट्ट्यात केवळ खरिपाचे पीक घेतले जाते. रब्बी पिकाचा तेथे फारसा प्रभाव दिसत नाही. त्यामुळे कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करतो. परंतु शेतकर्याने आत्महत्या केल्यावर विधवा झालेली महिला अत्यंत खंबीरपणे शेती व्यवसायात उभी राहात असल्याचे दिसून येते. याप्रसंगी दुर्गा तांबे म्हणाल्या की, नाशिक जिल्ह्यात शेतकरी हा अत्यंत प्रगतशील असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शेतकर्यांनी अत्यंत प्रेरणादायी प्रगती केली आहे, त्याचप्रमाणे महिलादेखील विविध क्षेत्रांत पुढे येत असून, शेती आणि दुग्ध उत्पादन – पशुपालन या क्षेत्रांत महिलांचे योगदान मोठे आहे. परंतु कृषी विद्यापीठानेदेखील महिलांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या त्याचप्रमाणे कृषीथॉन प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकरी महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत, याबद्दलही त्यांनी आयोजकांचे कौतुक केले. सुप्रिया देवघरे आणि आदित्य तुपे यांनी सूत्रसंचालन केले, तर अंकिता न्याहारकर यांनी आभार मानले.
यांचा झाला गौरव…
1) छाया कार्ट संस्था, पल्लवी चिंचवडे, कल्याणी शिंदे, रिना हिरे
2 ) महिला कृषी विस्तार कार्य : प्रा. अश्विनी चोथे, प्रा. परमेश्वरी पवार, पूजा वाघचौरे
3 ) महिला प्रयोगशील संशोधक : डॉ. अश्विनी चपले, डॉ. दर्शना भैसारे, डॉ. जयश्री कडू, डॉ. सोनम काळे, डॉ. नीता देवकाटे
4 ) महिला शेतकरी : अर्चना जाधव, अश्विनी साळुंखे, भावना निकम, भावना भंडारे, मथुरा जाधव, मीना पवार, पूनम डोकळे, संगीता पिंगळे, श्वेता पाटील, वैशाली अपसुंदे, ज्योती निचित.