कर्जत : पुढारी वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील देशमुखवाडीतील 20.30 हेक्टर जमिनीसाठी 5 कोटी 19 लाख 77 हजार 828 रुपये एवढी भूसंपादनाची रक्कम मंजूर झाली आहे.न जमीन संपादित झालेल्या शेतकर्यांना येत्या काही दिवसातच या रकमेचेे वाटप केले जाणार आहे. कुकडीच्या भूसंपादनाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. कुकडी कालव्यासाठी शेतकर्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या जमिनींचे भूसंपादन केले. परंतु, अनेक वर्षे या भूसंपादनाचा मोबदला शेतकर्यांना मिळालेला नाही आणि आजपर्यंतच्या लोकप्रतिनिधींनीही याबाबत पाठपुरावा केल्याचे दिसले नाही. मात्र, रोहित पवार यांनी आमदार झाल्यानंतर याबाबत सातत्याने जलसंपदामंत्री आणि अधिकार्यांकडे पाठपुरावा केला.
जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, वेगवेगळ्या भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी यांच्यासोबत सातत्याने बैठका घेऊन भूसंपादनातील अडचणी सोडवून शेतकर्यांना मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्याचे फलित म्हणून गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारकडे पाठपुरावा करून कोरोनाकाळात राज्याचे महसूली उत्पन्न घटले असतानाही, त्यांनी तब्बल 100 कोटींहून अधिक मोबदला शेतकर्यांना मिळवून दिला. याशिवाय रोहित पवार हे आमदार होण्यापूर्वी भूसंपादनाचे केवळ 2 कोटी 90 लाख रुपयेच शेतकर्यांना मिळाले होते.
आता कर्जत तालुक्यातील देशमुखवाडी परिसरातील जमीन संपादित झालेल्या शेतकर्यांसाठी 5.19 कोटी रुपये मंजूर झाले असून, आवश्यक कागदपत्रे शेतकर्यांकडून मागविण्यात आली आहेत. येत्या आठवड्यापासून त्याच्या वाटपाला देखील सुरुवात होणार आहे. दरम्यान, कुकडी कालव्यासाठी केलेल्या भूसंपादनाचा मोबदला अद्यापि अनेक शेतकर्यांना मिळालेला नाही. तोही मिळवून देण्यासाठी आमदार रोहित पवार यांचे प्रयत्न सुरूच आहेत.
भूसंपादनाचा मोबदला देताना वेगवेगळ्या कार्यालयात असलेले प्रस्ताव एकत्रित करणे, शेतकर्यांची संमती मिळवणे, शोध अहवाल घेणे, जिल्हा मूल्यांकन समितीकडे दर निश्चितीसाठी प्रस्ताव सादर करणे, पंचनामा, खरेदीखत अशी अत्यंत क्लिष्ट प्रक्रिया पार पाडावी लागते. ही प्रक्रिया सुलभ करून शेतकर्यांना तातडीने भूसंपादनाचा मोबदला मिळावा, यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जलसंपदामंत्री यांची रोहित पवार यांनी भेट घेतली होती. त्यानुसार काही दिवसांपूर्वीच महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन भूसंपादनाचा मोबदला देताना येणार्या अडचणी सोडवण्याबाबत चर्चा देखील झाली होती.
कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी कुकडी कालवा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु, कालवा झाल्यापासून याची दुरुस्ती किंवा गेटची दुरुस्तीही करण्यात आली नव्हती. आमदार रोहित पवार यांनी सुमारे 350 किलोमीटर चार्यांची स्वच्छता करून 220 नवीन गेट बसविले. तसेच, येडगावपासून कर्जतपर्यंत कालव्यातील दगड काढून खोलीकरणाचे काम देखील पूर्ण केले.
अनेक वर्षांपासून कुकडी कालव्यात जमीन संपादित झालेल्या शेतकर्यांना हक्काचा मोबदला मिळत नव्हता. परंतु, महाआघाडी सरकारच्या सहकार्याने 100 कोटींहून अधिक रक्कम त्यांना मिळाली. उर्वरित शेतकर्यांनाही मोबदला मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.
– आमदार रोहित पवार