नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा सप्ताह पंधरवड्यांतर्गत जिल्हा प्रशासनाने विविध प्रकारच्या १४ सेवांतर्गत ४ लाख ९५ हजार ६२ प्रकरणे निकाली काढली आहेत. ई-केवायसी अंतर्गत सर्वाधिक ३ लाख ८६ हजार ६४ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. तांत्रिक कारणास्तव प्रशासनाकडे ७९ हजार २२४ प्रकरणे प्रलंबित आहेत.
राज्य शासनाच्या आदेशानुसार, जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा सप्ताह राबविण्यात आला. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या मार्गदर्शनात शासनाने ठरवून दिलेल्या १४ सेवांतर्गत प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. त्यामध्ये अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना अनुदान वाटप, प्रलंबित फेरफार नोंदी निकाली काढणे, पंतप्रधान शेतकरी सन्मान योेजनेंतर्गत ई-केवायसीसह भूमी-अभिलेेखाप्रमाणे डेटा अपलोड करणे व निधीबाबतची तांत्रिक प्रकरणे तसेच शिधापत्रिका वितरण, विवाह नोेंदणी प्रमाणपत्र वितरणाबरोबर अन्य सेवांचा यात समावेश करण्यात आला. जिल्हा प्रशासनाने २ ऑक्टोबरपर्यंत दाखल 5 लाख ८४ हजार ८७२ प्रकरणांमधून ४ लाख ९५ हजार ६२ प्रकरणांचा निपटारा केला, तर तांत्रिक कारणास्तव उर्वरित ७९ हजार २२४ प्रकरणांमध्ये सर्वाधिक ५९ हजार ६४५ शेतकऱ्यांचे ई-केवायसी बाकी आहे. याशिवाय भूमी अभिलेखवर १४ हजार २१७ नोंदी अपलोड करणे तसेच शेतकरी सन्मान अंतर्गत तांत्रिक ५,३०१ प्रकरणे शिल्लक आहेत. दरम्यान, सेवा सप्ताहांतर्गत राज्यातील जनतेचा मिळालेला भरघोस प्रतिसाद आणि प्रशासनाकडून प्रकरणे निकाली काढण्याचा वेग बघता, शासनाने 5 नोव्हेंबरपर्यंत सप्ताहाला मुदतवाढ दिली आहे. शासनाच्या या निर्णयाचा फायदा सर्वसामान्यांना होणार असून, त्यांची प्रकरणे वेळेत निकाली निघण्यास मदत होणार आहे.
निकाली काढलेली प्रकरणे अशी….
अतिवृष्टीबाधितांना अनुदानवाटप 7,411, शेतकरी सन्मान योजना तांत्रिक प्रकरणे 140, भूमी अभिलेख डेटा अपडेट करणे 85,284, ई-केवायसी 3,86,064, फेरफार नोंदी 8,445, शिधापत्रिका वितरण 5,144, विवाह नोंदणी प्रमाणपत्र 57, नव्याने नळजोडणी (नगरविकास) 26, मालमत्ता करांची आकारणी व मागणीपत्र 92, घरगुती वीजजोडणी मंजुरी (महावितरण) 136, मालमत्ता हस्तांतरण वीजजोडणी 38, बिरसा मुंडा योजनेत सिंचन सुविधा 27, दिव्यांग प्रमाणपत्र 1, नाॅन-क्रिमिलेयर दाखले 2,197, एकूण 4,95,062.