भामा आसखेड; पुढारी वृत्तसेवा: वराळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने गतिरोधक उभारण्याची मागणी जवळपास दोन वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती, परंतु बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. बांधकाम विभागाने तत्काळ गतिरोधकाची उभारणी न केल्यास आंदोलनाचा इशारा माजी सरपंच विश्वास बुट्टे पाटील यांनी दिला आहे.
जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा चाकण-गडद-वांद्रा या प्रमुख जिल्हा मार्गालगत आहे. चाकण ते करंजविहिरेपर्यंत हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा आहे. यावर गतिरोधक नसल्याने आतापर्यंत अनेक जीवघेणे अपघात झाले आहेत. शाळेसमोरील रस्त्यावर देखील अनेक अपघात झाले आहेत. शाळा परिसरात ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय असून शाळेच्या समोरील रस्त्यालगत मोठा गृहप्रकल्प आहे.
तसेच प्राथमिक शाळेपासून काही अंतरावर आणखी एक शाळा आहे. त्यामुळे प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत कार्यालयाच्या रस्त्यालगत गतिरोधक बसविण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली होती, परंतु बांधकाम विभागाने काहीच कार्यवाही केली नाही. गतिरोधक तातडीने न उभारल्यास आंदोलनाचा इशारा बुट्टे पाटील यांनी दिला आहे. या रस्त्यावर गतिरोधकाची गरज आहे, परंतु बांधकाम विभागाने गतिरोधक उभारले नाहीत, असे मुख्याध्यापक मच्छिंद्र शेटे यांनी सांगितले.