पिंपरखेड स्मशानभूमीचे रूप लोकसहभागातून पालटले ! | पुढारी

पिंपरखेड स्मशानभूमीचे रूप लोकसहभागातून पालटले !

पिंपरखेड; पुढारी वृत्तसेवा: ग्रामस्थांनी लोकसहभागातून स्मशानभूमीची सुधारणा केल्याने स्मशानभूमीचे रूप पालटून गेले आहे. लोकवर्गणीतून ग्रामस्थांनी पेव्हिंग ब्लॉक बसविण्यासाठी 1 लक्ष 6 हजार आणि संरक्षण भिंतीसाठी 74 हजार रुपयांचा स्वनिधी उभा केल्याची माहिती माजी उपसरपंच रामदास ढोमे यांनी दिली.

संततधार पाऊस व सतत होणारे अंत्यविधींमुळे स्मशानभूमी परिसराची मोठी दुरवस्था झाली होती. याआधी ही सुधारणांसाठी माजी जि.प. सदस्या सुनीता गावडे यांचे माध्यमातून रस्ता व सभामंडपासाठी प्रत्येकी 10 लक्ष, सोसायटीचे माजी संचालक दशरथ वरे यांचे स्मरणार्थ कुटुंबीयांकडून 2 लक्ष 50 हजार एवढा निधी मिळाला होता. निधीतून सुसज्ज सभामंडप तयार झाल्याचे दिसून येत आहे.

तसेच सध्या स्मशानभूमी परिसराची दुरवस्था पाहून माजी उपसरपंच रामदास दरेकर व कुटुंबीयांनी आपल्या मातेच्या स्मरणार्थ 51 हजार रुपये निधी दिला आहे. पाच वर्षांपूर्वी लोकवर्गणीतून सुमारे 1 लक्ष 83 हजार, तर ग्रामविकास शिक्षण संस्थेचे सचिव किसन बोंबे यांचे स्मरणार्थ काही निधी जमा झाला होता. तसेच यापूर्वी 50 हजार रुपये लोकवर्गणीतून पिंडदान ओटा बांधला आहे. सध्या गावातील तरुणांनी स्मशानभूमी परिसराचे उर्वरित काम हातात घेतल्याने स्मशानभूमी परिसर स्वच्छ व सुंदर बनला आहे.

काम पूर्णत्वास नेण्यासाठी उपसरपंच विकास वरे, नरेश ढोमे, सोसायटी अध्यक्ष किरण ढोमे, उपाध्यक्ष नवनाथ पोखरकर, संचालक अशोक ढोमे, सतीश बोंबे, नरेंद्र बोंबे, दामोदर दाभाडे, ग्रामविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण ढोमे, निवृत्ती बोंबे, सत्यवान पोखरकर, लक्ष्मण गायकवाड आदींनी प्रयत्न केले.

Back to top button