बियांविरहित टरबूज खाणार भाव, दाभाडीचे शेतकरी निकम यांचा प्रयोग

बियांविरहित टरबूज खाणार भाव, दाभाडीचे शेतकरी निकम यांचा प्रयोग

मालेगाव (जि.नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
रंगबिरंगी फ्लॉवरचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर दाभाडीचे शेतकरी महेंद्र निकम यांना यावर्षी बियाविरहित टरबूज आणि पिवळा खरबूज लागवड केली आहे. साधारण एक एकरमध्ये घेतलेल्या या पिकातून त्यांना तीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न अपेक्षित असून, फक्त 60 दिवसांत माल विक्रीसाठी तयार झाला आहे. हा प्लॉट पाहण्यासाठी पंचक्रोशीतील शेतकर्‍यांबरोबरच विदेशी अभ्यास गटही भेटी देत आहेत.

निकम यांची नाशिक जिल्ह्यातील बेळगाव शिवारात 10 एकर शेतजमीन आहे. प्रारंभीपासूनच त्यांनी प्रयोगशीलता जपली. प्रथम लाल व पिवळ्या रंगाच्या शिमला मिरचीचे उत्पादन घेतले. त्यातून तब्बल 30 लाख रुपयांचे उत्पन्न पदरात पडल्यानंतर गतवर्षी कोरोना लॉकडाऊन काळात बहुगुणी रंगीत फ्लॉवरचे पीक घेतले. 30 गुंठे क्षेत्रातूनच पाच लाखांवर उत्पन्न मिळाल्याने त्यांनी यंदा बियाविरहित टरबूज आणि पिवळ्या खरबुजाची लागवड केली. एक एकर क्षेत्रात सहा हजार टरबुजांची, तर पंधराशे खरबुजांची वेल बहरली आहे. साधारण 50 हजार रुपयांच्या खर्चात अवघ्या 60 दिवसांत माल काढणीला आला आहे. उन्हाचा प्रकोप सुरू असताना थंडावा देणार्‍या टरबुजांना चांगलीच मागणी वाढली आहे. सुमारे 25 ते 30 टन माल निघून त्यास कमीत कमी 10 किलोप्रमाणे दर मिळाला तरी तीन लाख लाखांचे उत्पन्न लाभेल, अशी ते आशा बाळगून आहेत.

लहान मुलांना बियांविरहित फळ नक्कीच आवडेल, असा विश्वास त्यांना आहे. हॅप्पी फॅमिली व आयुष वाणाची लागवड केली आहे. त्यासाठी त्यांना कंपनीचे डॉ. राम वरगंटीवार यांचे मार्गदर्शन लाभले. या नावीन्यपूर्ण प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी विदेशी अभ्यासगटही अलीकडे येऊन गेला.

पारंपरिक शेतीला फाटा देतानाच एकच प्रयोग पुन्हा पुन्हा करणे टाळले. आता इफ्कोच्या जैविक खतांची मात्र आणि हॅप्पी फॅमिली व आयुष या वाणाची अनुक्रमे बियाविरहित टरबूज आणि खरबुजची लागवड केली. मोठ्या मॉलमधून या मालाला 20 रुपये किलोने मागणी झालीय. तरी कंपनीच व्हॅल्यू चेन उपलब्ध करून देत असल्याने अजून चांगला भाव मिळू शकतो.
– महेंद्र निकम
प्रयोगशील शेतकरी, दाभाडी

हेही वाचा :

logo
Pudhari News
pudhari.news