

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अनिश्चितता कायम असतानाही जिल्ह्यात मतदार नोंदणीला चांगला प्रतिसाद लाभतो आहे. गेल्या अडीच महिन्यांत निवडणूक शाखेकडे 56 हजार 142 मतदारांनी अर्ज सादर केले आहेत. या अर्जांमध्ये 38,228 इतक्या नवमतदारांच्या अर्जांचा समावेश आहे.
राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे अधिकार स्वत:कडे घेतले असून, तसा कायदाच केला आहे. परिणामी, नाशिकसह राज्यातील 15 महापालिका, 25 जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत येणार्या 284 पंचायत समित्या तसेच 208 नगर परिषदांच्या निवडणूक कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. या निवडणुका तब्बल सहा महिने लांबणीवर पडतील, अशी चर्चा आहे. त्यामुळे इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. परंतु, निवडणुकांबाबत अनिश्चितता कायम असताना नागरिकांकडून मतदार नोंदणीला चांगला प्रतिसाद लाभतो आहे.
जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघांतून मागील अडीच महिन्यांत 56 हजार 142 मतदारांनी निवडणूक शाखेकडे अर्ज केले आहेत. या अर्जांमध्ये नवमतदारांसोबत नाव व पत्त्यामध्ये दुरुस्ती, मृत, एका ठिकाणाहून दुसरीकडे वास्तव्यास गेलेल्या मतदारांचा समावेश आहे. निवडणूक शाखेकडून संबंधित अर्जांची पडताळणी करून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर ते अपडेट केले जात आहेत.
निवडणूक शाखेकडे प्राप्त अर्ज
नवमतदार………..38228
नाव वगळणे………..7865
नाव, पत्ता दुरुस्ती……5881
स्थलांतरित…………4168
एकूण…………….56142