कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
मंगळवार पेठ येथील सराफ व्यावसायिक अनिल गणपतराव पोवार (वय 56, रा. पोवार गल्ली, नंगीवली तालमीजवळ) यांनी शिवाजी पुलावरून पंचगंगेत उडी टाकून आत्महत्या केली. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. 18 तासांच्या शोधानंतर सायंकाळी मृतदेह आढळून आला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
करवीर पोलिस, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन तसेच अग्निशमन दलाच्या जवानांकडून पंचगंगा नदीपात्रात रविवारी दिवसभर शोधमोहीम राबविण्यात आली. शर्थीच्या प्रयत्नांनंतर सायंकाळी मृतदेह आढळून आला. मृतदेहाची ओळख पटताच नातेवाईकांनी हंबरडा फोडला. सराफ व्यावसायिक असलेले पोवार शनिवारी रात्री नऊ वाजता मोटारसायकल घेऊन घरातून बाहेर पडले. रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने मुलांनी शोधाशोध सुरू केली.
शनिवारी मध्यरात्री अनोळखी व्यक्तीने शिवाजी पुलाजवळ मोटारसायकल पार्किंग करून पंचगंगा नदीपात्रात उडी टाकल्याची माहिती लक्ष्मीपुरी व करवीर पोलिसांना मिळाली. रात्री उशिरा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. अंधारामुळे रात्रीची शोधमोहीम थांबविण्यात आली. रविवारी पहाटेपासून मृतदेहाचा शोध घेण्यात येत होता. त्यासाठी यांत्रिकी बोटीचा वापर करण्यात आला. सायंकाळी मृतदेह आढळून आला.
रविवारी पाचवा खेटा असल्याने जोतिबा दर्शनासाठी जाणार्या भाविकांनी सकाळपासून शिवाजी पुलावर गर्दी केल्याने वाहतूकही काहीकाळ विस्कळीत झाली होती. दुपारनंतर पोलिसांचा फौजफाटा पाचारण केल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे.