कराड : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत ११०० मल्ल | पुढारी

कराड : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत ११०० मल्ल

कराड : पुढारी वृत्तसेवा
तब्बल 59 वर्षांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान सातारा जिल्ह्याला मिळाला आहे. या स्पर्धेत राज्यभरातील सुमारे 1 हजार 100 मल्ल सहभागी होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी या स्पर्धा दिमाखदार होतील, असा विश्‍वास कराडमधील पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला आहे.

पुढील महिन्यात सातार्‍यात होणार्‍या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या तयारीचा आढावा ना. बाळासाहेब पाटील यांनी घेत प्रशासकीय अधिकार्‍यांना सूचना केल्या आहेत. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या संपर्कात असून प्रशासकीय यंत्रणेकडून आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू आहे. माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांचेही मार्गदर्शन घेतले जात आहे. राज्यभरातून येणार्‍या मल्लांची निवास व्यवस्था कोणकोणत्या ठिकाणी करण्यात आली आहे, त्या सर्व ठिकाणांची पाहणी करण्यात आली आहे. पाणी तसेच अन्य मूलभूत सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू असल्याचे ना. बाळासाहेब पाटील यांनी सांगितले आहे. नाष्टा व जेवण यासाठी स्वतंत्र ठिकाणी व्यवस्था करण्यात येणार आहे. त्या ठिकाणाचाही पाहणी करण्यात आली असून आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या आहेत. याशिवाय मैदानावरील सुविधांचाही आढावा घेतला असून रंगरंगोटीसह अन्य आवश्यक कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.

पाच मॅटवर होणार कुस्त्या

कुस्ती मैदानावर पाच मॅट असणार आहेत. या पाच मॅटवर कुस्त्या होणार आहेत. याशिवाय कोच, खेळाडू तसेच व्हीआयपी व्यक्‍ती बसण्यासाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय मल्ल तसेच कोच यांच्यासाठी आवश्यक त्या सुविधाही मैदानावर उपलब्ध असणार आहेत, असेही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले आहे.

Back to top button