नाशिक : महापालिकेचे अधिकारी पुन्हा “सैराट’, प्रभारी बदलल्याचा परिणाम

नाशिक : महापालिकेचे अधिकारी पुन्हा “सैराट’, प्रभारी बदलल्याचा परिणाम
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

तत्कालिन मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी मसुरीला रवाना होताच, महापालिकेत अधिकारी-कर्मचाऱ्यांचा आलबेल कारभार दिसून आला होता. त्यानंतर प्रभारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी काही ठोस निर्णय घेत सैर कारभाराला लगाम लावण्याचा प्रयत्न केला. आता गमे यांच्याकडील प्रभारी पदभार जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्याकडे सोपविताच पुन्हा एकदा अधिकारी 'सैराट' झाल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी (दि. ८) मुख्यालयात दिवसभर शुकशुकाट दिसून आलाच, शिवाय नागरी समस्या सोडविण्यास कोणी वाली आहे की नाही? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला गेला.

मिटिंग, व्हिजिटच्या नावाखाली अधिकाऱ्यांसह कर्मचारी दिवसभर गायब होत असल्याची बाब गमे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सकाळी १०.३५ वाजण्याच्या दरम्यानच मुख्यालयात भेट देत झाडाझडती घेतली होती. यावेळी अनेक अधिकारी तसेच कर्मचारी गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. काही अधिकारी तर १२ नंतर मुख्यालयात पोहोचल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी कामाच्या वेळा निश्चित करताना दोन वेळा पंचिंग सक्तीचे केले होते. तसेच ई-मूव्हमेंट ही प्रणालीदेखील कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याचबरोबर उशिरा येणारे तसेच वरिष्ठांची परवानगी न घेताच मुख्यालयातून गायब होणाऱ्या अधिकाऱ्यांचे वेतनही कपात केले गेले. तसेच विभागवार भेटींच्या सूचना दिल्या होत्या. आता गमे रजेवर गेल्याने त्यांचा पदभार जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविल्याने पुन्हा एकदा अधिकारी मुख्यालयातून गायब असल्याचे दिसून आले.

बुधवारी (दि. ७) सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांकडे मनपा आयुक्तपदाचा प्रभारी कारभार सोपविण्यात आला. त्यानंतर गुरुवारी (दि. ८) म्हणजे दुसऱ्याच दिवशी मुख्यालय ओस पडल्याचे दिसून आले. मोजकेच अधिकारी आपल्या दालनात हजर होते. इतर अधिकारी आणि कर्मचारी व्हिजिट आणि मिटिंगच्या नावे दिवसभर गायब असल्याने, मनपाचा सैरभैर कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दरम्यान, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या या बेलगाम कारभारावर गमे यांच्याप्रमाणे जिल्हाधिकारीही नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करणार काय, अशी चर्चा दिवसभर मुख्यालयात रंगली.

विभागवार भेटींना ब्रेक

अधिकारी-कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी गमे यांनी दोन्ही अतिरिक्त आयुक्तांना दिवसातून तीन वेळा प्रत्येक विभागात भेटी देण्याचे निर्देश दिले होते. यामुळे अधिकाऱ्यांसह कमर्चारीही शिस्तीत आल्याचे दिसून आले होते. आता जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रभारी पदाचे सूत्र येताच विभागवार भेटींना ब्रेक लागला आहे. त्यामुळे व्हिजिट आणि मिटिंगच्या नावे पुन्हा एकदा अधिकारी गायब होत असल्याचे दिसून आले.

पूर्णवेळ आयुक्तांची प्रतीक्षा

गेल्या महिनाभरापासून नाशिक महापालिकेचा कारभार 'प्रभारी' आयुक्तांवर अवलंबून आहे. सुरुवातीला महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे आणि आता जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्याकडे प्रभारी कारभार सोपविला आहे. यामुळे अधिकारी सैर होत असून, नागरी समस्यांकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. अशात पूर्णवेळ आयुक्तांची प्रतीक्षा केव्हा संपणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news