नाशिक, चांदवड : पुढारी वृत्तसेवा
संपूर्ण महाराष्ट्राची आदिशक्ती असलेल्या चांदवड निवासिनी राजराजेश्वरी कुलस्वामिनी रेणुकामातेच्या मंदिरात सोमवारी (दि.26) चांदवडचे प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख यांच्या हस्ते सपत्नीक घटस्थापना करण्यात येऊन नवरात्रोत्सवास प्रारंभ करण्यात आला. कोरोनाचे सावट दूर झाल्याने तब्बल तीन वर्षांनंतर नवरात्रोत्सव पुन्हा खुलेपणाने साजरा होत असल्याने भाविकांनी पहिल्याच दिवशी दर्शनासाठी मोठी गर्दी केली.
शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी रेणुकामातेचे सोने-चांदीच्या आभूषणांची शहरातील रंगमहालातून पालखीमध्ये सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शहरातील सुहासिनींनी घरासमोरून जाणार्या रेणुकादेवीच्या आभूषणांची मनोभावे हळद-कुंकू वाहून दर्शन घेतले. रेणुकादेवीच्या आभूषणांची दररोज सकाळी 8 वाजता रंगमहाल ते मंदिर व सायंकाळी पाच वाजता मातेचे मंदिर ते रंगमहाल अशी पालखी मिरवणूक निघणार आहे. या नवरात्रोत्सवाच्या काळात दर्शनासाठी येणार्या भाविकांना सकाळच्या वेळी बालरूपात, दुपारी तरुणरूपात व सायंकाळी वयोवृद्ध रूपात आपले रूप बदलत असल्याचे आजवरचे भाकीत आहे. घटस्थापनेच्या दिवशी रात्री आठला चांदवड न्यायालयाचे न्यायाधीश जोशी यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
मुंबई – आग्रा महामार्गावर असलेल्या निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत स्वयंभू विराजमान झालेल्या रेणुकामातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आदींसह विविध राज्यांतील भाविक येतात. ट्रस्टच्या वतीने नवरात्र काळात भाविकांसाठी विविध सुविधा पुरविण्यात येतात. यंदाच्या उत्सव काळात भाविकांना पिण्याच्या पाण्याची तीन ते चार ठिकाणी व्यवस्था करण्यात
आली आहे.
भाविकांसाठी निवासाची व्यवस्था
नवरात्रोत्सव काळात अनेक भाविक मंदिराच्या परिसरात यात्रोत्सव संपेपर्यंत घटी बसत असतात. या घटी बसणार्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी ट्रस्टने मंदिर परिसरात प्रशस्त इमारतीच्या खोल्यांमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे.
पोलिस बंदोबस्तात वाढ
मंदिराच्या आवारात क्लोज सर्किट कॅमेरे लावण्यात आले असून, त्याद्वारे भाविकांवर करडी नजर राहणार आहे. भाविकांच्या वाहनाची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. या उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापक मधुकर पवार, सहायक व्यवस्थापक सुभाष पवार, चांदवडचे पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी, होमगार्ड, स्वयंसेवक यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे.